वॉशिंग्टन : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या आणखी १० कोटी लसींची खरेदी करण्याचा आदेश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो. बायडेन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे अमेरिकेकडे लसीचा अतिरिक्त साठा होण्याची शक्यता आहे. त्यातून अमेरिका जगाला लसींचा पुरवठा करू शकेल. अमेरिकेमध्ये प्रत्येक प्रौढ व्यक्तीला आता कोरोना लस देण्यात येणार आहे. (US to buy 100 million Johnson & Johnson vaccines)
अमेरिकी नागरिकांना प्राधान्याने लस देण्यात येतील व त्यातून अतिरिक्त लसी राहिल्या तर त्याचा जगाला पुरवठा करण्यात येईल, असे बायडेन यांनी नुकतेच सांगितले होते. अमेरिकेतील लहान मुलांकरिता कोणती लस प्रभावी ठरेल, यावर अद्याप पुरेसे संशोधन झालेले नाही. त्या संशोधनाचे निष्कर्ष हाती आल्यानंतर लहान मुलांनाही कोरोनाची लस देण्याबाबत बायडेन सरकार धोरण जाहीर करण्याची शक्यता आहे.
४० कोटी लोकांना पुरेल इतका कोरोना लसींचा साठा करण्यावर व प्रत्येक नागरिकाला जुलै अखेरपर्यंत कोरोना लस देण्यावर बायडेन सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्याचप्रमाणे अॅस्ट्राझेनेका व नोवावॅक्स कंपनीच्या कोरोना लसींचीही खरेदी करण्यात येईल.
मेक्सिको, युरोपीय देशांकडून लसींची मागणीअमेरिकेकडे मेक्सिको, युरोपीय देश तसेच कॅनडाने कोरोना लसींची मागणी केली आहे. मात्र, त्यापैकी कोणालाही अमेरिकेने अद्याप लसीचा पुरवठा केलेला नाही. ४५ देशांना चीनने त्याची लस पुरविली. २.६ अब्ज लसींचे दरवर्षी उत्पादन आम्ही करू शकतो, असा दावा चीनमधील चार औषधी कंपन्यांनी केला आहे. रशियानेही स्पुटनिक लसीचा जगातील काही देशांना पुरवठा केला आहे.