US Election : विजयानंतरच्या पहिल्याच भाषणात कमला हॅरीस यांच्याकडून भारताचा उल्लेख
By महेश गलांडे | Published: November 8, 2020 06:50 PM2020-11-08T18:50:22+5:302020-11-08T18:51:02+5:30
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.
वॉशिंग्टन : अमेरिकेतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनण्याचा मान कमला हॅरिस यांनी पटकावला आहे. मतदानानंतर मतमोजणीवरून बरेच दिवस पेच चालल्यानंतर अखेर अध्यक्षीय निवडणुकीत जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा काल झाली. तसेच बायडन यांच्यासोबत डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष बनल्या. निवडणुकीतील विजयानंतर कमला हॅरीस यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. त्यांच्या या पहिल्याच भाषणात त्यांनी भारताचा उल्लेख केला.
अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांचे भारताशी खास नाते आहे. त्या आपल्या आईसोबत नेहमी भारतात येत असतात. भारतीय आई आणि जमैकन वडील असलेल्या कमला हॅरिस ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. त्यांचा जन्म १९६४ मध्ये श्यामला गोपालन हॅरिस आणि वडील डोनाल्ड हॅरिस यांच्या घरी झाला होता. घटस्फोटानंतर आई श्यामला गोपालन यांनी कमला यांचा सांभाळ केला. निवडणूक निकालानंतर भाषण करताना, त्यांनी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल माहिती दिली. त्यावेळी, वयाच्या 19 व्या वर्षी माझी आई श्यामला गोपालन या अमेरिकेत आल्या, तेव्हा भविष्यात आजचा हा दिवस पाहायला मिळेल, अशी कल्पनाही त्यांन केली नसेल, असे म्हणत भारत ते अमेरिका आणि अमेरिका उपराष्ट्राध्यक्षांच्या मातोश्री या रंजक प्रवासाचं वर्णण कमला यांनी केलं. मात्र, माझ्या आईला अमेरिकेवर तेवढाच विश्वास होता, त्यामुळेच हा क्षण प्रत्यक्षात उतरला, असेही कमला यांनी म्हटलं
While I may be the first, I won’t be the last. pic.twitter.com/R5CousWtdx
— Kamala Harris (@KamalaHarris) November 8, 2020
आई-वडिलांप्रमाणेच कमला हॅरिस यासुद्धा खूप शिकलेल्या आहेत. ब्राऊन विद्यापीठामधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठामधून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रॅन्सिस्को डिस्ट्रिक्ट अॅटॉर्नी ऑफीसमध्ये काम सुरू केला. तिथे त्यांना क्रिमिनल युनिटचे इन्चार्ज बनवण्यात आले.
असा आहे कमला हॅरिस यांचा राजकीय प्रवास
कमला हॅरिस यांचा अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूप कौतुकास्पद आहे. २००३ मध्ये कमला हॅरिस ह्या सॅन फ्रान्सिस्कोच्या कौन्टीच्या डिस्ट्रिक्ट अॅटॉर्नी म्हणून नियुक्त झाल्या. त्यानंतर त्या कॅलिफोर्नियाच्या अटॉर्नी जनरल बनल्या. पुढे २००७ मध्ये कमला हॅरिस ह्यांनी कॅलिफोर्नियामधन संयुक्त राज्यांच्या सिनेटर म्हणून शपथ घेतली. हा मान मिळवणाऱ्या त्या दुसऱ्या कृष्णवर्णीय महिला बनल्या. त्यांनी होमलँड सिक्युरिटी अँड गर्व्हर्मेंट अफेअर्स कमिटी, इंटेलिजन्स सिलेक्ट कमिती, ज्युडिशियरी कमिटी आणि बजेट कमिटीमध्येही काम केले. हळूहळू त्यांची लोकप्रियता खूप वाढली. विशेषकरून त्यांच्या भाषणांना ब्लॅक लाइव्ह मॅटर आंदोलनावेळी खूप पाठिंबा मिळाला. हॅरिस ह्या सिस्टिमॅटिक वर्णभेद समाप्त करण्यासाठी नेहमीच बोलत असतात.
तामिळनाडूत त्यांच्या आईचं गाव
कमला हॅरिस यांनी २१ जानेवारी २०१९ रोजी अमेरिकेच्या २०२० मध्ये होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारीची घोषणा केली होती. मात्र गतवर्षी ३ डिसेंबर रोजी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती. राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्यानंतर कमला हॅरिस यांनी जो बायडन यांना आपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांचे नाव समोर आले होते. कमल हॅरिस यांच्या आई श्यामला गोपालन हॅरिस ह्या भारतीय आहेत. त्यांचे मूळ गाव तामिळनाडूमध्ये आहे. कमला यांचा सांभाळ आईने केल्याने त्यांच्यावर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. त्या अनेकदा भारतात येत असतात. आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्या भारताबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.