वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्षपदाची निवडणूक हा संपूर्ण जगासाठी उत्सुकतेचा विषय असतो. या महासत्तेच्या अध्यक्षपदी कोण निवडून येणार यावर जागतिक राजकारणाचा पट अवलंबून असतो. सर्वशक्तिमान राष्ट्राच्या अध्यक्षपदाच्य निवडणुकीची उत्कंठा सर्वांनाच आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीची बुधवारी सकाळपासून सुरू असलेली मतमोजणी अद्याप सुरूच आहे. सध्याच्या घडीला डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन (Joe Biden) आघाडीवर आहेत. तर विद्यमान अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) पिछाडीवर पडले आहेत.
यासंदर्भात, बायडन म्हणाले, आपण निश्चितपणे विजयी होत आहोत. मात्र, सध्या सह प्रमुख राज्यांत मतमोजणी सुरू आहे. या चुरशीच्या लढाईचा निकाल रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प अथवा डेमोक्रेट ज्यो बायडन कुणाच्याही पारड्यात जाऊ शकतो.
ज्यो बायडन यांच्या नावे नवा विक्रम - डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्या नावे एक मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. अमेरिकेतील निवडणुकीच्या इतिहासात एखाद्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराला आतापर्यंत सर्वाधिक मते मिळण्याचा विक्रम ज्यो बायडन यांच्या नावे झाला आहे. आतापर्यंतच्या मोजणीत बायडन यांना 7 कोटी मते मिळाली आहेत. तर डोनाल्ड ट्रम्प यांना 6.8 कोटी मतांच्या जवळपास आहेत. या पूर्वी हा विक्रम बराक ओबामा यांच्या नावे होता. त्यांना 6.94 कोटी मते मिळाली होती.ज्यो बायडन अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इलेक्टोरल मतांच्या जादुई आकड्याच्या जवळ पोहोचले आहेत. ज्यो बायडन यांना आतापर्यंत २६४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत.तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मतं मिळाली आहेत. या अध्यक्षपदासाठी २७० इलेक्टोरल मतं मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्यो बायडन यांना विजय मिळविण्यासाठी फक्त आणखी सहा इलेक्टोरल मतं गरजेची आहेत.
आता आपल्याच विजय होईल, असा आत्मविश्वास ज्यो बायडन यांना दिसत आहे. ज्यो बायडन यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. ते म्हणाले, "मला विश्वास आहे की आपण जिंकू, मात्र हा माझा विजय किंवा आपला विजय होणार नाही. तर अमेरिकन लोकांसाठी, आपल्या लोकशाहीसाठी, अमेरिकेसाठी हा विजय असेल."
तर, दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी मत मोजणीत काही तरी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. काल रात्रीपर्यंत अनेक राज्यांमध्ये मला चांगली आघाडी मिळाली होती. यामध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे सरकार असलेल्या राज्यांचाही समावेश होता. मात्र, अचानक काहीतरी जादू झाल्याप्रमाणे एकएक करुन अनेक राज्यांतील आघाडी नाहीशी झाली. याचे कारण म्हणजे बोगस मतांचीही मोजणी करण्यात आली. हा सर्व प्रकार धक्कादायक आहे, असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षाचे चार विद्यमान भारतीय खासदार पुन्हा चमकलेअध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकी भारतीय मतदारांनी कळीची भूमिका निभवल्याचे निदर्शनास येत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान चार खासदारांची फेरनिवड करून भारतीय मतदारांनी ट्रम्प प्रशासनाविरोधातील रोष मतपेटीतून व्यक्त केला आहे. फ्लोरिडा, जॉर्जिया, मिशिगन, नॉर्थ कॅरोलायना, पेनसिल्व्हानिया आणि टेक्सास या अटीतटीच्या राज्यांमध्ये तब्बल १८ लाख भारतीय मतदार आहेत. या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षांनी भारतीय उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यातील डॉ. अमी बेरा, प्रमिला जयपाल, रो खन्ना व राजा कृष्णमूर्ती या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान खासदारांची फेरनिवड मतदारांनी केली आहे. भारतीय मतदारांची संख्या जास्त असलेल्या राज्यांना ‘समोसा कॉकस’ असे म्हटले जाते. त्यात या चारही खासदारांचा समावेश आहे.
मीरा नायर यांचा मुलगाही विजयीचित्रपटनिर्मात्या मीरा नायर यांचा मुलगा झोहरान ममदानी यांची न्यू यॉर्क स्टेट असेम्ब्लीमध्ये निवड झाली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाकडून न्य़ू यॉर्क स्टेट असेम्ब्लीमध्ये निवडून येणारे ते पहिलेच भारतीय ठरले आहेत.
श्रीनिवासराव कुलकर्णी पराभूतटेक्सासमधून डेमोक्रॅटिकपक्षातर्फे निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले अमेरिकी-भारतीय उमेदवार श्रीनिवासराव कुलकर्णी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
आतापर्यंतची सर्वात महागडी निवडणूककोरोना संसर्गाने अमेरिकेला घट्ट विळखा घातला असतानाही अध्यक्षीय निवडणुकीच्या धामधुमीत कोणताही फरक पडला नाही. उलटपक्षी आतापर्यंतची ही सर्वात महागडी निवडणूक म्हणून ओळखली जात आहे. तब्बल १४ अब्ज डॉलर या निवडणुकीत खर्च झाले. ‘सेंटर फॉर रिस्पॉन्सिव्ह पॉलिटिक्स’ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती स्पष्ट झाली आहे. गेल्या निवडणुकीत खर्चाचे प्रमाण निम्मेच होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत फारसा पैसा खर्च होणार नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. ११ अब्ज डॉलरपर्यंत खर्च होईल, असा अनुमान होता. मात्र, जसजशी निवडणूक जवळ येत गेली तसतसा मतदारांचा उत्साह वाढत गेला. अनेकांनी स्वखुशीने निधी देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आतापर्यंत १४ अब्ज डॉलर एवढा खर्च या निवडणुकीत झाल्याचे स्पष्ट होत आहे.