US Election: डोनाल्ड ट्रम्प का हरले?; जाणून घ्या पराभवास कारणीभूत ठरणारे ५ महत्वाचे मुद्दे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 01:00 AM2020-11-09T01:00:31+5:302020-11-09T07:02:25+5:30
निवडणुकीत बायडेन विजयी झाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्याप हार मानायला तयार नाहीत.
अध्यक्षपदाच्या दुसऱ्या खेपेसाठी प्रयत्नशील असताना निवडणुकीत हार पत्करावे लागणारे डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या २८ वर्षांतील पहिले अध्यक्ष ठरले आहेत. त्यांच्या पराभवाची मीमांसा यथावकाश केली जाईलच; परंतु पुढील मुद्दे ट्रम्प यांच्या पराभवास प्रामुख्याने कारणीभूत ठरले...
१. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात आलेले अपयश
२. कोरोनाच्या साथीला अमेरिकेत सुरुवात झाली त्यावेळी ट्रम्प यांनी बेफिकिरी दाखवीत या आजाराची खिल्ली उडवली होती- गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय यांच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न
३. कोरोनाग्रस्त अर्थव्यवस्था हाताळण्यात अपयश
४. आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सातत्याने बेताल वर्तणूक
५. देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था हाताळण्यात अपयश
ट्रम्प यांची मनधरणी?
निवडणुकीत बायडेन विजयी झाले असले तरी मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अद्याप हार मानायला तयार नाहीत. बायडेन विजयी झाल्याचे अमेरिकी प्रसारमाध्यमांनी जाहीर करताच व्हाईट हाऊसमधून बाहेर पडत ट्रम्प यांनी थेट गोल्फ मैदानाची वाट धरली. दरम्यान, ट्रम्प यांनी पराभव स्वीकारावा यासाठी त्यांचे जावई व सल्लागार जेर्ड कुश्नेर ट्रम्प यांची मनधरणी करणार असल्याचे समजते. ट्रम्प यांनी अद्याप हार मानलेली नसून सोमवारपासून ते कायदेशीर लढाईला सुरुवात करणार असल्याचे त्यांच्या प्रचारयंत्रणेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर ट्रम्प यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची दाट शक्यता आहे. अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा गैरवापर ट्रम्प यांनी त्यांच्या कारकीर्दीत केला किंवा कसे, याची पडताळणी करण्यात येणार असल्याचे समजते, तसेच २०१६ मध्ये रशियाच्या मदतीने अध्यक्षीय निवडणुकीत ढवळाढवळ केली का, याचाही तपास केला जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे ट्रम्प सहजासहजी अध्यक्षपद सोडणार नाहीत, अशा अटकळी बांधल्या जात आहेत.