वॉशिंग्टन : अमेरिकेत २ दशलक्ष हिंदू असून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल फिरविण्याची क्षमता असलेल्या अनेक राज्यांत (स्विंग स्टेटस्) हिंदूंचे मतदान महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन अमेरिकी लोकप्रतिनिधीगृह ‘काँग्रेस’चे भारतीय-अमेरिकी सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी केले आहे. हिंदू समुदायास मी सांगू इच्छितो की, मताधिकार बजावणे हा आपला धर्म आहे, असेही कृष्णमूर्ती म्हणाले.‘हिंदू अमेरिकन्स फॉर बायडेन’ मोहिमेचा औपचारिक शुभारंभ करण्यासाठी आयोजित समारंभात कृष्णमूर्ती यांचे बीज भाषण झाले. इलिनोईसमधून तीन वेळा डेमोक्रॅटिक पक्षाचे काँग्रेस सदस्य राहिलेल्या कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ३ नोव्हेंबरच्या निवडणुकीत आपल्या समुदायाने डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनाच मतदान करायला हवे.हिंदूंचा ‘वसुधैव कुटुंबकम’ या मूल्यावर विश्वास आहे. त्याची जपणूक जो बायडेन आणि कमला हॅरिस याच करू शकतात. त्यामुळे मतदान करणे हे आमचे कर्तव्य आहे. नव्हे, नव्हे, तो आमचा धर्मच आहे. तो आम्ही निभावला पाहिजे.या राज्यांत हिंदू मते बजावणार महत्त्वपूर्ण भूमिकाकृष्णमूर्ती यांनी सांगितले की, ही आमच्या जीवन काळातील सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे. फ्लोरिडा, व्हर्जिनिया, पेन्सिल्व्हानिया, मिशिगन आणि विस्कोन्सिन यासारख्या अनेक स्विंग स्टेटस्मध्ये हिंदूंची मते निर्णायक ठरणार आहेत.
अमेरिकेतील निवडणुकीत हिंदूंची मते स्विंग स्टेटस्मध्ये निर्णायक - कृष्णमूर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:42 AM