आक्षेपार्ह फोटो, टॅक्स चोरी, नशा अन्...मुलामुळे राष्ट्राध्यक्ष US जो बायडन अडचणीत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 06:15 PM2023-12-15T18:15:20+5:302023-12-15T18:15:47+5:30
अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीला मंजुरी दिली.
joe biden america: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, यांचा मुलगा हंटर बायडन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बुधवारी अमेरिकेच्या संसदेने राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याविरुद्ध महाभियोग चौकशीला मंजुरी दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुलामुळेच राष्ट्राध्यक्ष बायडेन अडचणीत आले आहेत. 53 वर्षीय हंटर बायडेनचा वादाशी जुना संबंध आहे. सध्या तो ड्रग्ज घेणे आणि करचुकवेगिरीच्या आरोपांमुळे चर्चेत आहे.
अंमली पदार्थ आणि आलिशान आयुष्य जगण्याचा शौकीन असलेल्या हंटरने जूनमध्ये आपल्याजवळ बेकायदेशीर शस्त्रे असल्याची कबुली दिली होती. घटस्फोटानंतर त्याची पत्नी कॅथरीननेही त्याच्याविरोधात अनेक खुलासे केले, ज्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली. हंटर ड्रग्ज, अल्कोहोल आणि स्ट्रिप क्लबवर इतका पैसा खर्च करायचा की, त्याच्याकडे गरजा पूर्ण करण्यासाठी पैसेच उरले नसल्याचा आरोप कॅथरीनने केला होता. अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आले होते.
भावाच्या मृत्यूमळे नशेच्या आहारी
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, हंटरचा मोठा भाऊ ब्यू बायडेनचा 2015 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यूमुळे हंटर इतका इतका दुःखात बुडाला की, तो दिवसभर दारुच्या नशेत राहू लागला. हळुहळू तो ड्रग्सच्या आहारी गेला. नंतर त्याने अंमली पदार्थांच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठी पेटिंग काढण्यास सुरुवात केली. मात्र यावरुनही वाद सुरू झाला. काही लोकांनी त्याची चित्रे कोट्यावधींना विकत घेतल्यावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले.
व्यक्ती एक अन् वाद अनेक
हंटरचे नाव अनेक वादाशी जोडले गेले आहे. 2013 मध्ये तो यूएस नेव्ही रिझर्व्हमध्ये सामील झाला, परंतु पहिल्याच दिवशी कोकेन घेताना पकडला गेला. यानंतर त्याला सैन्यातून हाकलून दिले. 2019 मध्ये डीएनए अहवालातून समोर आले होते की, तो अर्कान्सस नावाच्या मुलाचा जैविक पिता(बायलॉजिकल फादर) आहे. याशिवाय, 2020 मध्ये त्याच्या लॅपटॉपमधून आक्षेपार्ह फोटोही व्हायरल झाली होती. हंटरवर चीनी इक्विटी कंपनी बीएचआर आणि युक्रेनची ऊर्जा कंपनी बुरिस्मा होल्डिंग, यांच्याकडून बेकायदेशीरपणे पैसे घेतल्याचाही आरोप होता.