संयुक्त राष्ट्रे : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास आंतरराष्ट्रीय दबाव वाढवित अमेरिकेने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसुदा प्रस्ताव सादर केला. अमेरिकेच्या या प्रयत्नाला फ्रान्स व ब्रिटनचे समर्थन आहे.सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंध समितीमध्ये अझहरचा समावेश करीत त्याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावावर चीनने वीटोचा वापर केल्यानंतर दोन आठवड्यांनी अमेरिकेने हा प्रस्ताव १५ सदस्यीय परिषदेला पाठविला आहे. संयुक्त राष्ट्राच्या सूत्रांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन व फ्रान्सने प्रथमच अझहरचे नाव काळ्या यादीत टाकण्यास थेट एक मसुदा प्रस्ताव पाठविला आहे.या घटनाक्रमाबाबत विचारले असताना चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांनी बीजिंगमध्ये बोलताना सांगितले की, अमेरिकेने जे पाऊल टाकले आहे त्यामुळे हा मुद्दा आणखी गुंतागुंतीचा होणार आहे. या निर्णयाने यूएनएससीच्या समितीचे अधिकार कमी केले आहेत.मतदानाची तारीख अद्याप अनिश्चितसूत्रांनी सांगितले की, मसुदा प्रस्तावावर अनौपचारिक चर्चा केली जाईल. त्यानंतर तो परिषदेत जाईल. हे निश्चित नाही की, मसुदा प्रस्तावावर मतदान केव्हा आहे. यादरम्यान चीन पुन्हा एकदा वीटोचा वापर करू शकतो. या प्रस्तावात काश्मिरातील पुलवामात १४ फेब्रुवारी रोजी झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.
मसूदला काळ्या यादीत टाकण्यासाठी अमेरिकेचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 1:07 AM