स्वस्त फोनसाठी अमेरिकेची भारतीय कंपन्यांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 05:32 AM2020-10-22T05:32:17+5:302020-10-22T07:05:43+5:30
अमेरिकेतील व्हेरिझोन, टी-मोबाइल, एटीअँडटी आणि क्रिकेट वायरलेस (टीअँडटीची उपकंपनी) या कंपन्यांनी भारतातील मायक्रोसॉफ्ट आणि लावा या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांशी वाटाघाटी सुरूही केल्या आहेत.
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाखाली चिनी कंपन्यांवर अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने निर्बंध आणल्यामुळे स्वस्त मोबाइल फोन उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकी दूरसंचार कंपन्यांनी भारतीय कंपन्यांकडे धाव घेतली आहे. याचा थेट फायदा मायक्रोमॅक्स आणि लावा यासारख्या कंपन्यांना होईल, असे सूत्रांनी सांगितले.
सूत्रांनी सांगितले की, अमेरिकेतील व्हेरिझोन, टी-मोबाइल, एटीअँडटी आणि क्रिकेट वायरलेस (टीअँडटीची उपकंपनी) या कंपन्यांनी भारतातील मायक्रोसॉफ्ट आणि लावा या स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांशी वाटाघाटी सुरूही केल्या आहेत. बिगर-ब्रँडेड हँडसेटसाठी या वाटाघाटी केल्या जात आहेत. हे हँडसेट अमेरिकी कंपन्या डाटा सबस्क्रिप्शनसह आपल्या देशात विकतील.
काही दिवसांपूर्वीपर्यंत भारतीय कंपन्यांना निविदा प्रक्रियेत सहभागीही होऊ दिले जात नव्हते; पण आता चित्र पूर्णत: बदलले आहे. त्याचे सध्याचे स्वरूप थेंबाचे आहे. त्याचे रूपांतर लवकरच लाटेत होईल, असे औद्योगिक क्षेत्रातील सूत्रांनी सांगितले.