वॉशिंग्टन- गेले काही दिवस इराण करारावरुन सुरु असलेल्या शंका आता खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिका-इराण अणूकरार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जॉइंट कॉम्प्रहेन्सिव प्लान फॉर अॅक्शन म्हणजेच जेसीपीओए अशा नावाने हा करार इराण व अमेरिका यांच्यामध्ये ओबामा प्रशासनाने केला होता. इराणी अणुबॉम्बला थांबवणे अशक्य असल्याचे दिसत नाही, त्यामुळे हा करार मागे घेण्याचा मी निर्णय घेत आहे असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी या कराराला सत्तेत येण्यापूर्वीपासूनच विरोध केला होता. हा करार मूळापासूनच चुकीचा आहे असेही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले.या करारामुळे इराणला भरपूर पैसा मिळेल मात्र त्यांना अण्वस्त्र खरेदी करण्यापासून मात्र रोखता आले नसते. अमेरिकेने इराणवर नवी बंधने घातली असून इतर देशांनाही इराणपासून दूर राहा असे संकेत दिले आहेत. या कराराबद्दल बोलताना ट्रम्प म्हणाले, " हा करार एकदम एकांगी होता. तो कधीही करायला नको होता. त्याने शांतता प्रस्थापित झाली नाही आणि कधी होणारही नव्हती." इतकेच नव्हे तर इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम सोडण्याचे दिलेले आश्वासन म्हणजे एक थापच आहे. या कराराला पुढे चालू ठेवल्याने मध्य-पूर्वेत शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीला लागली असती आणि इराणच्या अस्थिरता पसरवणाऱ्या वर्तनाला थांबवता आले नसते.अमेरिकेने इराणवर लादलेल्या नव्या बंधनांमुळे तेलाचे दर भडकण्यास सुरुवात झाली आहे. आधीच व्हेनेझुएलामधील अस्थिरता व घटलेले उत्पादन यामुळे तेलाचे दर वाढत आहेत. त्यातच ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे तेलाच्या दरांमध्ये आज 2 ते 3.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेलाचे दर प्रती बॅरल 76. 75वर गेले आहेत. नोव्हेंबर 2014 नंतर प्रथमच तेलाच्या दराने ही पातळी गाठली आहे.
ट्रम्प यांनी रद्द केला अमेरिका-इराण करार; तेलाचे दर भडकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2018 12:06 PM