CoronaVirus News: तुम्ही तुमचं बघून घ्या! अमेरिकेनं भारताला दाखवला ठेंगा; कोरोना संकटात अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 01:27 PM2021-04-24T13:27:50+5:302021-04-24T13:30:00+5:30
CoronaVirus News: कोरोना संकटात असलेल्या भारताला अमेरिकेचा मोठा धक्का; भारताची मागणी फेटाळली
वॉशिंग्टन: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून दररोज तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा कोरोनाचे १ लाख नवे रुग्ण सापडले. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा तीन लाखांवर जाऊन पोहोचला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे. मात्र या मोहिमेला धक्का बसला आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल देण्यास अमेरिकेनं नकार दिल्यानं भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीरमची लस भारतातच सगळ्यात महाग; श्रीलंका, बांगलादेशातही 'खासगी'पेक्षा स्वस्त मिळतेय 'कोविशिल्ड'
कोरोना लसीसाठी आवश्यक कच्चा माल देण्याची विनंती भारतानं अमेरिकेकडे केली होती. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल देशाबाहेर न पाठवण्याचा निर्णय अमेरिकेनं घेतला आहे. ही निर्यातबंदी मागे घेण्याची विनंती भारताकडून करण्यात आली होती. मात्र अमेरिकेनं निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. आमचं प्राधान्य अमेरिकन नागरिकांना आहे. आमचे नागरिक ही आमची जबाबदारी आहे, असं उत्तर अमेरिकेकडून भारताला देण्यात आलं आहे.
भारताच्या उपकारांची अमेरिकेला विसर
गेल्या वर्षी अमेरिकेत कोरोनाची भीषण लाट आली होती. त्यावेळी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेलं हायड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला निर्यात करण्यात आलं होतं. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनाला केंद्र सरकारनं अनुकूल प्रतिसाद दिला होता. भारतातून हायड्रॉस्किक्लोरिक्वीनच्या कोट्यवधी गोळ्या निर्यात केल्या गेल्या. अमेरिका संकटात असताना भारतानं माणसुकीच्या भावनेतून मदत केली. मात्र आता भारत अडचणीत असताना अमेरिकेनं मात्र हात वर केले आहेत.