ब्रिटनमधील या गावातील लोकांसाठी हिरो आहे विजय मल्ल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 11:26 AM2017-12-04T11:26:48+5:302017-12-04T11:32:29+5:30
ब्रिटनमधील टेविन गावात राहणा-या अब्जाधीश कुटंबांचं विजय मल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण केलं जाऊ नये असं म्हणणं आहे. येथील लोकांसाठी विजय मल्ल्या एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.
टेविन (युके) - भारताने याचवर्षी जून महिन्यात भारतीय बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या विजय मल्ल्या यांना फरार घोषित केलं आहे. मल्ल्या यांन लवकरात लवकर भारतात आणून, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भारतीयांची इच्छा आहे. पण ब्रिटनमधील टेविन गावात राहणा-या अब्जाधीश कुटंबांचं मात्र विजय मल्ल्या यांचं भारतात प्रत्यार्पण केलं जाऊ नये असं म्हणणं आहे. लंडनपासून जवळपास 48 किमी अंतरावर असणा-या या गावातच विजय मल्ल्याचं घर आहे. येथील लोकांसाठी विजय मल्ल्या एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही.
विजय मल्ल्या यांच्यावर 17 बँकांचं 9000 कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप आहे. हे कर्ज विजय मल्ल्यांनी बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलं होतं. विजय मल्ल्या यांच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा गुन्हाही दाखल आहे. विजय मल्ल्या यांनी नुकतंच जवळपास दोन हजार घरं असलेल्या या गावाला एक ख्रिस्मस ट्री खरेदी करुन दिला आहे. ज्यानंतर येथील लोकांच्या मनात विजय मल्ल्यांनी घर केलं असून, त्यांच्यासाठी सन्मान वाढला आहे.
क्राऊन पबमधील बारमॅनने सांगितलं आहे की, 'विजय मल्ल्या आमच्या गावासाठी मोठी संपत्ती आहे. अशी व्यक्ती आमच्या येथे आहे याचा आम्हाला आनंद आहे. ते फॉर्म्यूला वनशी जोडलेले आहेत हे आम्हाला खूपच प्रभावित करणारं आहे'. पुढे बोलताना त्याने सांगितलं की, 'विजय मल्ल्या एखाद्या अडचणीत आहेत याबद्दल येथील लोकांना माहिती आहे. पण अनेक श्रीमंत लोक कोणत्या ना कोणत्या तरी अडचणीत असतातच. त्यांचं प्रत्यार्पण केलं जाऊ नये अशी आम्हाला आशा आहे. त्यांनी येथेच राहू द्यावं. ते आमच्या पबमध्ये येत राहोत'.
कंट्री बंपकीन कॅफेच्या आचा-याने सांगितलं की, 'विजय मल्ल्या जमिनीशी जोडलेले आहेत. ते नेहमी आपली पत्नी आणि मुलांसोबत येथे येत असतात. ते श्रीमंतांप्रमाणे कोणताही देखावा करत नाहीत. मला माहितीये की, भारत सरकार त्यांचा शोध घेत आहे, पण आम्हाला त्याची काळजी नाही. जगा आणि जगू द्या'.
मल्ल्यांचं पलायन -
मल्ल्या यांच्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी स्टेट बँकेसह 17 बँकांनी कर्ज दिले होते. स्टेट बँक या सर्व बँकांचे नेतृत्व करत आहे. सर्व बँकांचे मिळून तब्बल 9000 करोड रुपये किंगफिशर एअरलाईन्सने थकवले आहेत. 2 मार्चला विजय मल्ल्या दुपारी 1.30 वाजता जेट एअरवेजच्या दिल्ली - लंडन ‘9W 122’ विमानाने रवाना झाले होते. विजय मल्ल्या यांना देश सोडून जाण्यास मनाई करणारा आदेश द्यावा याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात १७ सार्वजनिक बँकांच्या कन्सोर्टियमने याचिका केली होती, मात्र विजय मल्ल्या अगोदरच देश सोडून रवाना झाल्याची माहिती ऍटर्नी जनरल यांनी न्यायालयात दिली होती.