हिंसक व्हिडीओ गेममुळे मुलांना होतेय बंदूक चालविण्याची इच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 08:27 AM2022-05-26T08:27:20+5:302022-05-26T08:27:46+5:30
अमेरिकेतील पाहणीचा निष्कर्ष; मानसिक निराशा हेही महत्त्वाचे कारण
ह्युस्टन : अमेरिकेत अनेक मुले हिंसक व्हिडिओ गेम सातत्याने खेळत असतात. त्यातील ६० टक्के मुलांना आपणही बंदूक चालवून पाहावी, अशी इच्छा होते. त्यातून व मानसिक तणावामुळे शाळा, तसेच सार्वजनिक ठिकाणी अंदाधुंद गोळीबारासारख्या घटना घडतात, असे एका पाहणीच्या अहवालात म्हटले आहे. अशी हत्याकांडे घडण्याच्या कारणांमध्ये हिंसक व्हिडिओ गेम हेदेखील महत्त्वाचे कारण असल्याचे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील म्हटले होते.
उवाल्डे येथील प्राथमिक शाळेत मंगळवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने सारी अमेरिका शोकाकुल झाली आहे. अशा घटनांसंदर्भातील एका पाहणीच्या अहवालात म्हटले आहे की, गोळीबाराच्या घटनांचे हिंसक व्हिडिओ गेम खेळणाऱ्या मुलांच्या बंदूक चालवून पाहण्याची इच्छा प्रबळ होते. जर्नल ऑफ दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन या नियतकालिकामध्ये या अहवालाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले आहेत.
या पाहणीत २०० मुलांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील निम्म्या मुलांना हिंसेचा लवलेशही नसलेले व अन्य मुलांना हिंसक व्हिडिओ गेम देण्यात आले. मुलांपैकी ६० टक्के मुलांच्या मनात बंदूक चालवून पाहण्याची इच्छा जागी झाली. त्याबद्दलच्या अहवालात म्हटले होते की, पालकांनी हिंसक व्हिडिओ गेमपासून आपल्या मुलांना दूर ठेवले पाहिजे.
‘गोळीबार रोखण्यासाठी हव्या ठोस उपाययोजना’
अमेरिकेतील उवाल्डे येथील शाळेत घडलेला गोळीबार अत्यंत भीषण स्वरूपाचा आहे. अशा घटनांवर केवळ शोक व्यक्त करून थांबू नये. ही हत्याकांडे रोखण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत, असे प्रख्यात अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने म्हटले आहे. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड चित्रपटसृष्टीत अधिक कार्यरत आहे. शाळेतील गोळीबाराच्या घटनेचा सेलेना गोमेझ, टेलर स्विफ्ट, आर. माधवन, आदी सेलिब्रिटीजनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
यंदा अंदाधुंद गोळीबाराच्या २७ घटना
यंदाच्या वर्षी अमेरिकेत अंदाधुंद गोळीबाराच्या २७ घटना घडल्या आहेत. २०२१ साली शाळांमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनांत १०३ जण ठार झाले होते. २०१८ ते २०२१ सालापासून असे ११९ प्रकार घडले आहेत. २०२०पेक्षा २०२१ साली अशा घटनांत ५० टक्के वाढ झाली.
एप्रिल १९९९- अमेरिकेतील कोलोरॅडो येथील लिटलटॉन येथे शाळेत दोन विद्यार्थ्यांनी केलेल्या गोळीबारात बाराजण ठार झाले होते.
मार्च २००५ - १६ वर्षे वयाच्या एका विद्यार्थ्यांने आपल्या आजोबा व त्यांच्या एका सहाकाऱ्याला ठार मारले व तो जवळच्या रेड लेक हायस्कूलमध्ये गेला. तिथे त्याने केलेल्या गोळीबारात ५ विद्यार्थी, एक शिक्षक, सुरक्षारक्षक मारला गेला.
एप्रिल २००७ - व्हर्जिनिया टेक येथे २३ वर्षे वयाच्या व्यक्तीने केलेल्या गोळीबारात ३२ जणांचा मृत्यू झाला होता.
डिसेंबर २०१२ - कनेक्टिकट येथील न्यूटाउन येथे १९ वर्षे वयाच्या एका युवकाने आपल्या आईची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर तेथील एका शाळेत
गोळीबार करून २० लोकांना ठार केले.
फेब्रुवारी २०१८ - फ्लोरिडामधील पार्कलँड येथे एका युवकाने शाळेत केलेल्या गोळीबारात १४ विद्यार्थ्यांनी जीव गमावला होता.
फेब्रुवारी २०१८ - ह्युस्टनमधील हायस्कूलमध्ये एका हल्लेखोराने १० जणांना गोळ्या झाडून ठार केले होते. त्यानंतर शाळेतील गोळीबाराची सर्वात भीषण घटना मंगळवारी उवाल्डेच्या शाळेत घडली आहे.
गेल्या पाच वर्षांत जगभरात शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटना. त्यातील ८० टक्क्यांहून अधिक घटना अमेरिकेत घडल्या आहेत.
nअमेरिका - २८८ । मेक्सिको - ८ । दक्षिण आफ्रिका - ६ । भारत - ५ । नायजेरिया - ४ । पाकिस्तान -४ । अफगाणिस्तान - ३ । कॅनडा -२ । फ्रान्स - २ । ब्राझिल - २ । इस्टोनिया -१ । केनिया - १ । जर्मनी - १ । तुर्कस्थान - १ । रशिया - १ ।चीन - १