जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येने 23 कोटींचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णांची संख्या 232,374,363 वर पोहोचली आहे. तर 4,759,028 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनावरील उपचारानंतर आतापर्यंत 208,995,547 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले असून रुग्णांच्या वाढत्या संख्येने तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोनाने आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. याच दरम्यान कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. मात्र अद्यापही काही जणांच्या मनात लसीबाबत भीती असून ते लसीकरणाला विरोध करत आहेत.
कोरोना लसीला विरोध करणाऱ्यांना आता लसीकरणाचं महत्त्व पटत असल्याचं समोर येत आहे. अशीच एक घटना आता समोर आली आहे. लसीला कडाडून विरोध करणाऱ्या एका मॉडेलने मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आता ती लोकांना कोरोना लस घेण्याचं आवाहन करत आहे. 43 वर्षीय हॉलीने (Holly McGuire) कोरोनाची लस आल्यानंतर तिला खूप विरोध केला. पण य़ाच दरम्यान तिला दोनदा कोरोनाची लागण झाली आणि दोन्ही वेळा ती सुदैवाने मृत्यूच्या दारातून परतली. डॉक्टरांना तिच्या जगण्याची फक्त 15 टक्केच आशा होती. तसेच तिला श्वास देखील घेता येत नव्हता.
आधी केला लसीला विरोध अन् आता करतेय लस घेण्याचं आवाहन
कोरोनामुळे हॉलीच्या फुफ्फुसांवर अत्यंत वाईट परिणाम झाला होता. ते खराब होत होते. याच दरम्यान तिला निमोनिया देखील झाला. सहा आठवडे रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर आता तिने लोकांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. सुरुवातीला हॉलीने लसीला विरोध केला होता. मी ध्रूमपान करत नाही, व्यायाम करते. त्यामुळे मला कोरोनाच होणार नाही असं म्हटलं होतं. पण आता तिला कोरोनाचं संकट किती मोठं आहे हे चांगलंच समजलं आहे.
लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती
कोरोनातून बरं झाल्यानंतर हॉलीने लोकांनी लस घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच स्वत: देखील लस घेतली आहे. तसेच लस न घेण्याची चूक करू नका असं म्हटलं आहे. आता ती लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडे भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच कोरोनाबाबतच्या रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक असल्याचं म्हटलं आहे. रिसर्चमधून कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण हे दहापट अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे.