वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय दूतावासाने नव्या कंपनीला व्हिसासंबंधी आऊटसोर्सचे काम सोपविले आहे. ही कंपनी येत्या काळात अमेरिकेतील सहा शहरांमध्ये व्हिसा केंद्र सुरू करणार आहे. कॉक्स अँड किंग्स ग्लोबल सर्व्हिसेसने (सीकेजीएस) घोषणा केली की, वॉशिंग्टन डीसी, न्यूयॉर्क, अटलांटा, शिकागो, ह्यूस्टन आणि सॅन फ्रान्सिस्को या शहरात २१ मेपासून व्हिसा केंद्र कार्यान्वित होणार आहेत. भारतीय व्हिसासाठी इच्छुकांना मदत करणे, परदेशात स्थायिक झालेले भारतीय (ओसीआय), भारतीय वंशाचे (पीआयओ) आणि भारतीय नागरिकत्व सोडण्याच्या आदी गरजा या केंद्राच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. वॉशिंग्टन डीसीस्थित भारतीय दूतावासाने घोषणा केली होती की, अमेरिकेत व्हिसा आऊटसोर्सिंगकरिता सीकेजीएसला जबाबदारी सोपविण्यात आली आहे. व्हिसा सेवेसाठी आऊटसोर्सचा निर्णय घेतल्यानंतर पाच वर्षांच्या काळात ही तिसरी कंपनी आहे. सीकेजीएस सेवा केंद्र पर्यटन, व्यापार, संमेलन, विद्यार्थी व्हिसासह सर्व श्रेणीतील काम बघणार आहे. तसेच केंद्रात अमेरिकेत राहणार्या विविध नागरिकत्व असलेल्या लोकांकडूनही अर्ज स्वीकारले जाणार आहेत. (वृत्तसंस्था)
अमेरिकेत सहा शहरांत उघडणार व्हिसा केंद्र
By admin | Published: May 21, 2014 2:25 AM