व्हिसाधारकांच्या जोडीदारास अमेरिकेत नोकरीची मुभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 04:24 AM2019-11-11T04:24:33+5:302019-11-11T04:24:40+5:30
एच-१ बी व्हिसा मिळालेल्या अमेरिकेतील भारतीयांच्या पती किंवा पत्नीला तिथे नोकरी करण्याची मुभा यापुढेही कायम राहणार आहे.
वॉशिंग्टन : एच-१ बी व्हिसा मिळालेल्या अमेरिकेतील भारतीयांच्या पती किंवा पत्नीला तिथे नोकरी करण्याची मुभा यापुढेही कायम राहणार आहे. ओबामा सरकारने केलेल्या या नियमाला अंतरिम स्थगिती देण्यास अमेरिकेतील न्यायालयाने नकार दिला आहे.
विशेष कार्यकुशल पदांसाठी अमेरिकेतील कंपन्या विदेशातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करतात. अशा कर्मचाऱ्यांना एच-१ बी व्हिसा मिळतो. एच-४ व्हिसाधारकांमधील काही प्रवर्गांना विशेषत: एच-१ बी व्हिसाधारकांपैकी जे ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, अशांच्या पती किंवा पत्नीला अमेरिकेत नोकरी करण्याची परवानगी देणारा नियम ओबामा सरकारने २०१५ साली केला होता. त्याचा अमेरिकेत नोकरी करणाºया भारतीयांना विशेषत: त्यांच्या पत्नीला मोठा फायदा झाला होता. मात्र, या नियमाला मूळ अमेरिकी नागरिकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या या भूमिकेला डोनाल्ड ट्रम्प सरकारनेही पाठिंबा दर्शविला आहे.
अमेरिकेच्या कोलंबियातील न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाचा खटला पुन्हा कनिष्ठ न्यायालयाकडे वर्ग केला. एच-१ बी व्हिसाधारकांच्या पती-पत्नीला अमेरिकेत नोकरी करण्यास असलेली मुभा रद्द करावी की नाही, याबद्दलच्या याचिकेवर कनिष्ठ न्यायालयच निर्णय घेईल असे वरिष्ठ न्यायालयाने म्हटले आहे.
एच-४ व्हिसाधारकांना वर्कपरमिट देण्याचे धोरण ट्रम्प यांच्याआधीचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी राबविल्याने आपल्या हातातून रोजगाराच्या संधी निसटत असल्याचा मूळ अमेरिकी नागरिकांचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)
>नागरिकत्व मिळण्यात अडचणी
एच-१ बी व्हिसाधारकांना अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिकत्व मिळण्याच्या प्रक्रियेतही अनेकदा विलंब होतो. त्यामुळे या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
त्यावरही कनिष्ठ न्यायालयाने विचार करावा असे कोलंबियातील न्यायालयाने म्हटले आहे.