विमानाच्या पायऱ्या चढताना तीनवेळा घसरले जो बायडेन; व्हाईट हाऊसनं दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2021 08:30 PM2021-03-20T20:30:48+5:302021-03-20T20:33:27+5:30
Jo Biden : विमानात प्रवेश करताना बायडेन तीन वेळा घसरले, व्हिडीओ सोशल मीडियावर झाला व्हायरल
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) हे त्यांच्या सर्वात सुरक्षित विमानाच्या पायऱ्या चढतेवेळी तीनवेळा घसरल्याचा प्रकार घडला होता. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला होता. यानंतर या घटनेसंदर्भात व्हाईट हाऊसनं स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच जो बायडेन हे १०० टक्के ठीक आहेत, अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली.
रिपोर्ट्सनुसार बायडेन हे एअर फोर्स वन या विमानात जात होते. यावेळी ते तीन वेळा घसरले. यानंतर व्हाईट हाऊसच्या डेप्युटी प्रेस सेक्रेटरी कॅरीन दीन यांनी जोरदार हवा त्या ठिकाणी सुरू असल्यानं हा प्रकार घडला असल्याचं म्हटलं. तसंच जो बायडेन हे १०० टक्के ठीक आहेत, असंही त्या म्हणाल्या.
बायडेन पायऱ्यांवरून घसरल्याचा व्हिडीओ वेगाने व्हाय़रल होत आहे. विमानात चढत असताना बायडेन हे घसरले होते. सावरून उठत असताना ते पुन्हा घसरले. त्यांना स्वत:ला सांभाळले आणि पुढे चालू लागले. तर दोन पायऱ्या होत नाही तोच तिसऱ्यांदा पाठीवर पडले. यानंतर उठून ते चालत वर गेले आणि मागे वळून सॅल्यूट केला.
President Joe Biden trips climbing the stairs to Air Force 1 pic.twitter.com/x8UD7q0a48
— The Hill (@thehill) March 19, 2021
अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष
जो बायडेन हे अमेरिकेचे सर्वात वृद्ध राष्ट्राध्यक्ष आहेत. गेल्य़ा वर्षीच्या सप्टेंबरमध्ये बायडेन यांच्या डाव्या पायाला हेअरलाईन फ्रॅक्चर झाले होते. ते त्यांच्या श्वानासोबत खेळत होते. ७८ वर्षांच्या बायडेन यांनी २० जानेवारीला राष्ट्राध्य़क्षपदाची शपथ घेतली होती. ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद सांभाळणारे सर्वात वृद्ध नेते आहेत.