20 इंच उंची अन् 26 किलो वजन; जगातील सर्वांत ठेंगण्या गायीला पाहण्यासाठी लॉकडाऊनमध्येही प्रचंड गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 01:38 PM2021-07-09T13:38:49+5:302021-07-09T13:41:52+5:30
smallest cow : राजधानी ढाकाजवळील एका फॉर्ममधील ही 23 महिन्यांची गाय बांगलादेशी मीडियामध्ये एका रात्रीत स्टार झाली आहे. या गायीची देशभर चर्चा होत आहे.
ढाका : कोरोना संकट काळातही बांगलादेशात अवघ्या 20 इंच उंचीची बौनी गाय 'राणी'ला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे. जगातील सर्वात छोटी ही गाय असल्याचा दावा तिच्या मालकाने केला आहे. राजधानी ढाकाजवळील एका फॉर्ममधील ही 23 महिन्यांची गाय बांगलादेशी मीडियामध्ये एका रात्रीत स्टार झाली आहे. या गायीची देशभर चर्चा होत आहे.
गायीची एकूण लांबी 26 इंच
तोंडापासून शेपटीपर्यंत राणी नावाच्या या गायीची लांबी 26 इंच आहे. साधारण गायींच्या तुलनेत 23 महिन्यांच्या या गाईचे वजनही केवळ 26 किलो आहे. या गाय मालकांचा असा दावा आहे की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवलेल्या सर्वात लहान गायींपेक्षा ती चार इंच लहान आहे. मात्र, जगातील सर्वात लहान गाय म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे अधिकृतपणे अद्याप याची नोंद करण्यात आली नाही.
लॉकडाऊनमध्येही या गायीला पाहण्यासाठी गर्दी
कोरोनामुळे बांगलादेशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. असे असतानाही लोक ढाकापासून 19 मैलावर असलेल्या चरिग्राममधील शेतात रिक्षा घेऊन येत आहेत. शेजारच्या शहरातून ही गाय पाहायला आलेल्या 30 वर्षीय रीना बेगम म्हणाल्या की, 'माझ्या आयुष्यात मी असे कधी पाहिले नव्हते. शिकार अॅग्रो फार्मचे व्यवस्थापक एम.ए. हसन होवळदार यांनी ही गाय टेपने मोजली आणि ती सर्वांना दाखविली.
सध्या कमी उंचीच्या गायीचा विक्रम भारतातील माणिक्यम गायीच्या नावावर
आतापर्यंत जगातील सर्वात छोट्या गायीची नोंद भारताच्या केरळ राज्यातील माणिक्यम नावाच्या गायीच्या नावावर आहे. 2014 मध्ये वेचूर जातीच्या माणिक्यम गायीची लांबी 24 इंच मोजली होती. जर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने त्याला अधिकृत मान्यता दिली तर बांगलादेशची ही 'राणी' जगातील सर्वात छोटी गाय होईल. या गायीच्या मालकाने सांगितले की, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने आपल्या यादीत समाविष्ट करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी घेतला आहे.
आतापर्यंत 15 हजार जणांनी दिली भेट
या गाईचे पालन करणाऱ्या शिकार अॅग्रो फार्मच्या मॅनेजरने सांगितले की, कोरोना व्हायरस लॉकडाऊन असूनही, लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून ही गाय पाहायला येत आहेत. बर्याच लोकांना 'राणी'बरोबर सेल्फी घेण्याची इच्छा आहे. फक्त तीन दिवसांत जवळपास 15 हजार जणांनी आतापर्यंत राणीला पाहण्यासाठी या फार्मला भेट दिली आहे.
Thousands in Bangladesh lineup to see Rani, a dwarf cow running for the title of world's smallest cow. The 23-month-old cow stands about 20in high. Rani has become a media celeb. pic.twitter.com/e9JCnQoNKZ
— Naila Inayat (@nailainayat) July 8, 2021