काश्मीर मुद्द्यांवर आम्ही पाकिस्तानसोबत; भारताच्या 'या' निर्णयावर भडकलं अझरबैजान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:55 AM2023-12-22T10:55:24+5:302023-12-22T10:55:52+5:30
अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता.
नवी दिल्ली - आर्मेनियाच्या मुद्द्यावरून भारताचे अझरबैजानसोबतचे संबंध सातत्याने बिघडत आहेत. अझरबैजानचे भारतातील माजी राजदूत अश्रफ शिकालीव यांनी काश्मीरवर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला आहे. अझरबैजानने काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानशी सहकार्याची भूमिका कायम ठेवली आहे असं राजदूताने एका मुलाखतीत म्हटले आहे.
गेल्या ३० वर्षांत अझरबैजानची काश्मीरबाबतची भूमिका बदललेली नाही, ती अजिबात बदललेली नाही असं अझरबैजानचे राजदूत म्हणाले, जे नोव्हेंबरपर्यंत भारतात अझरबैजानचे राजदूत म्हणून काम करत होते. भारत आणि पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांचा आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचा आदर करून हा प्रश्न शांततेने सोडवावा. ही आमची भूमिका आहे. गेल्या तीन दशकात यात कोणताही बदल झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केले आहे.
अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव यांनी यापूर्वी २०२० मध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानला पाठिंबा दर्शवला होता. त्यावेळी अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले होते की, २१ जानेवारी २०२० रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत दावोस येथे झालेल्या भेटीदरम्यान अझरबैजानचे राष्ट्रपती इल्हाम अलीयेव म्हणाले की अझरबैजान जम्मू आणि काश्मीर मुद्द्यांवर पाकिस्तानला नेहमी पाठिंबा देईल.
आर्मेनिया आणि अझरबैजानमध्ये अनेक दशकांपासून युद्ध
अर्मेनिया आणि अझरबैजान अनेक दशकांपासून नागोर्नो-काराबाखवर नियंत्रण मिळवण्यासाठी लढा देत आहेत. २०२० मध्ये या प्रदेशावरील शत्रुत्वाचे रूपांतर मोठ्या संघर्षात झाले आणि दोन्ही देशांचे सैन्य रणांगणात उतरले. अझरबैजानने आर्मेनियावर लढाई जिंकली आणि २०२३ मध्ये नागोर्नो-काराबाख पूर्णपणे ताब्यात घेतला.
अर्मेनियाने भारतासोबत केलेल्या शस्त्राच्या डीलवर भडकले अझरबैजानचे राष्ट्रपती
काही महिन्यांपूर्वी आर्मेनियाने भारत आणि फ्रान्ससोबत शस्त्रास्त्रांचा मोठा करार केला होता. या करारात हवाई संरक्षण यंत्रणा, चिलखती वाहने आणि इतर शस्त्रे खरेदीचा समावेश आहे. अझरबैजानचे राष्ट्रापती इल्हाम अलीयेव या करारावर संतापले होते. आगीत पेट्रोल टाकण्याचं काम भारत आणि फ्रान्स एकत्र काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. ते म्हणाले होते, भारत आणि फ्रान्ससारखे देश आर्मेनियाला शस्त्रे पुरवून आग आणखी भडकतवत आहेत. हे देश अर्मेनियामध्ये असा भ्रम निर्माण करत आहेत की या शस्त्रांच्या मदतीने ते काराबाख परत घेऊ शकतात.