डोनाल्ड ट्रम्प यांचे भवितव्य काय? महाभियोगातून बचावले, पण कोर्टात खेचण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:56 AM2021-02-16T05:56:47+5:302021-02-16T05:57:10+5:30
Donald Trump : ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प महाभियोगाच्या अग्निपरीक्षेतून जाण्यापासून दुसऱ्यांदा वाचले असले तरी त्यांच्याविरोधातील असंतोष एवढा आहे की, ट्रम्प यांना कोर्टात खेचा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. अध्यक्षपदी असताना काही विशेष नियमांचे, कायद्यांचे कवच ट्रम्प यांना लाभले होते. मात्र, आता अध्यक्षपदावरून उतरल्यानंतर त्यांच्यावर सामान्य नागरिकाप्रमाणे कारवाई केली जाऊ शकते, असा सूर उमटू लागला असून राजकीय वर्तुळातही दबक्या आवाजात का होईना चर्चा सुरू झाली आहे.
ट्रम्प यांच्यावर आरोप काय?
कॅपिटॉल हिल या अमेरिकी संसदेच्या इमारतीवर हल्ला करण्यासाठी समर्थकांना चिथावले, हा मुख्य आरोप ट्रम्प यांच्यावर आहे. ६ जानेवारी रोजी हा हल्ला झाला होता. त्यात एका पोलिसासह पाच जण ठार झाले होते
ट्रम्प यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरू करण्यासाठी सेनेटमध्ये ६७ मतांची गरज होती. ५७ विरूद्ध ४३ अशा मताधिक्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला. ट्रम्प यांच्याच रिपब्लिकन पक्षाच्या सात सिनेटर्सनी महाभियोग प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला होता.सेनेटमध्येच प्रस्ताव फेटाळला गेल्याने लोकप्रतिनिधीगृहात हा प्रस्ताव येऊ शकला नाही.
आता पुढे काय?
- ट्रम्प यांच्यावर कोर्टात खटला दाखल करता येऊ शकतो.
- केवळ कॅपिटॉल हिलवरील हल्ला, हे एकच प्रकरण नव्हे तर अनेक प्रकरणांवरून ट्रम्प यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
- अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान जॉर्जियातील निवडणूक कर्मचाऱ्यांवर दबाव टाकल्याप्रकरणीही ट्रम्प यांच्यावर खटला सुरू आहे.
- कॅपिटॉल हिलवरील हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाइकांकडूनही ट्रम्प यांच्यावर खटला दाखल केला जाऊ शकतो.
- कथित आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोपही ट्रम्प यांच्यावर आहे.
- कॅपिटॉल हिल हल्ला प्रकरणावेळी ट्रम्प काय करत होते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. परंतु याप्रकरणी आतापर्यंत शेकडो लोकांची धरपकड झाली आहे.
- माजी अध्यक्षांविरोधातील गुन्हेगारी प्रकरणे वेगवेगळ्या राज्यांत नोंद असतील तर ते एकत्रित करून मध्यवर्ती न्यायव्यवस्थेकडे वर्ग केले जाऊ शकतात.