स्पेनमधली मुलं रस्त्यावर धावली तेव्हा..
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 02:58 AM2020-04-30T02:58:51+5:302020-04-30T02:59:12+5:30
४४ दिवस ही मुलं घरात राहिली; मात्र कालचा रविवार त्यांच्यासाठी स्वातंत्र्य घेऊन आला.
४४ दिवस मुलं घरात होती. कोंडलेलीच. बाहेर जायची परवानगी नाही. देशात मृत्यूचं थैमान. १४ वर्षांखालच्या मुलांना धोका नको म्हणून त्यांना घराबाहेर पडण्यास, बागेत, रस्त्यावर खेळण्यासही सक्त मनाई केली होती. ४४ दिवस ही मुलं घरात राहिली; मात्र कालचा रविवार त्यांच्यासाठी स्वातंत्र्य घेऊन आला.
स्पेनची ही गोष्ट. रविवारी सकाळी ९ ते रात्री ९ दरम्यान १४ वर्षांखालील मुलांना घराबाहेर पडण्याची आणि आपल्या घराभोवती किलोमीटरभर अंतरावर फिरण्याची, पळण्याची, खेळण्याची परवानगी सरकारने दिली. एका दिवसापुरतीच. त्या दिवशी ही सारी पाखरं घराबाहेर पडली. कितीतरी दिवसांनी त्यांनी पायात रनिंग शूज घातले. बाहेर जायचे कपडे घातले. सायकली बाहेर काढल्या. मुलं मनसोक्त हुंदडली. पळाली. त्यांनी उड्या मारल्या. बागेत गेली. स्पेनमध्ये या वयाची साधारण ६ लाख मुलं आहेत. त्यांनी कितीतरी दिवसांनी बाहेरचं जग पाहिलं. अनेक मुलांनी माध्यमांना सांगितलं की, ‘आधी वाटलं आपण पळणं, सायकल चालवणं विसरलो की काय? पण जमलं!’ या मुलांचे पालक दमले त्यांच्यासोबत फिरून; पण मुलं थकली नाहीत. त्या दिवशी खऱ्या अर्थानं शहरं पुन्हा जिवंत झाली, जगण्याची आस रस्त्यावर धावली. आता २ मेपासून आपल्या राहत्या घराच्या आसपास दिवसातून एक तास फिरण्याचा, व्यायाम करण्याच्या परवानगीचा विचार सरकार करत आहे. कोरोनाचे काळे ढग हटतील, जगणं पुन्हा मोकळा श्वास घेईल, अशी आशा वाटू लागावी, असं काहीतरी रविवारी तेथे घडलं.