पॅराग्वे नावाची एक नदी. दक्षिण अमेरिकेतली. तिच्यावर जगणारा आजूबाजूचा प्रदेश म्हणून या देशाचंच नाव पॅराग्वे. मात्र आता भीती अशी की ही नदी आटत रूक्ष वाळवंट होते की काय? भोवतालचं नदीच्या काठानं जगणारं जनजीवन, परिसंस्था सारं त्यामुळे संकटात आहे. पॅराग्वे हा लॅण्डलॉक देश. बोलिविया, अर्जेण्टिना, ब्राझील आणि उरुग्वेच्या सीमा भोवताली. पाण्यासाठी सारी मदार या पॅराग्वे नदीवरच. पण नदीचा विस्तार असा मोठा की बंदरासारखी मालवाहतूक तिच्यातून होते. नदीत चालणारी सर्वाधिक जहाजं याच नदीत चालतात. जगात बडा कृषी निर्यातदार देश म्हणून पॅराग्वेची ओळख आहे. पण आता भय असं की हे सारं असं किती दिवस टिकेल? कारण ही नदी आटायला लागली आहे.. पाऊस कमी झाला, दुष्काळ तर आहेच या प्रदेशात, पिण्याच्या पाण्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अर्थव्यवस्था तोलून धरणाऱ्या नदीची खालावलेली पातळी आता धोक्याचा इशारा देते आहे.. आता उरल्या गाळात नांगरांचे फाळ अडकू लागले आहेत, मगरी पाण्याबाहेर तडफडत आहेत. गेले दोन-तीन वर्षे आटणारी नदी स्थानिक भूगोल, हवामनतज्ज्ञ चिंता व्यक्त करत होतेच; पण आता नदीतला गाळ उघडा पडला आहे.. अल जझिरा या वृत्तवाहिनेने या नदीवर अलीकडेच एक छायाचित्र मालिका प्रसिद्ध केली, त्यातले छायाचित्रं पाहून जगात अनेकांनी चिंता व्यक्त केली. आटलेली पाण्याची पातळी, उघडी पडलेली जमीन, पक्ष्यांचे गाळात किडे शोधत उडणारे थवे, बंदरावरचे ओकेबोके चित्र, फाटलेले झेंडे आणि कचऱ्याचे ढीग, त्या ढिगात काही बऱ्या वस्तू सापडतात, म्हणून ती शोधणारी माणसं. चिखलात काहीबाही शोधणारी लहान-मोठी माणसं आणि उघडे पडलेले नदीतले खडक.
नद्यांचा भविष्यकाळ हा असा असेल का असं म्हणत या नदीच्या वर्तमान वास्तवाची चर्चा झाली. मात्र त्या चर्चेपलीकडे स्थानिकांचा पिण्याच्या पाण्याचा चालू वर्तमानकाळातला प्रश्न मोठा आहे. गेल्या अर्धशतकभरात पॅराग्वे नदीनं सगळ्यात कमी पातळी गाठली आहे. या प्रदेशात दुष्काळाचा हा परिणाम, पण त्यामुळे पॅराग्वे देशाची अर्थव्यवस्थाच कोलमडली. या देशाचा ८६ टक्के विदेश व्यापार या नदीतून होतो. ब्राझीलमध्ये उगम पावणारी ही नदी पॅराग्वेची जीवनवाहिनी होते आणि पुढे थेट बोलिविया आणि अर्जेण्टिनापर्यंत वाहत जाते. पॅराग्वेच्या आयात संघटनेचे अध्यक्ष नेरी गिमेनेझ माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगतात, ‘ आज जे आम्ही भोगतोय अशी इतकी भयाण परिस्थिती आम्ही कधीही अनुभवलेली नाही. आता वर्षाखेरीस वस्तूंची जास्त आयात होते; पण नदीत पाणीच कमी असल्यानं मालवाहू जहाजांची संख्याही कमी झाली आहे. त्यात कोरोना लॉकडाऊन झालं. इंधन, खतं, धान्य यासह अनेक गोष्टींचा तुटवडा भासला. आता अर्थव्यवस्थेला गती द्यायची म्हणून सरकारने लॉकडाऊन शिथिल करायला सुरुवात केली, मात्र नदीची जलपातळी घटल्याने नवेच प्रश्न उभे राहिले आहेत.’
पॅराग्वे जलवाहतूक उद्योगानं आतापर्यंत २५ कोटी अमेरिकन डॉलर्सचा तोटा सहन केला आहे असं जहाजमालकी संस्थेचे अध्यक्ष सांगतात. ते काळजीनं सांगतात, ‘अजूनही संकट टळलेलं नाही, आता काळजी अशी आहे की दिवसाला नदीची जलपातळी ३ ते ४ सेंटिमीटर्सने खाली जाते आहे. दळणवळण स्थिती आजच गंभीर आहे, जी अजून गंभीर होण्याची शक्यता आहे. शक्यता अशी की येत्या आठवडाभरात असूनशियोन बंदरावर एकही बोट पोहोचू शकणार नाही.’ असूनशियोन ही पॅराग्वेची राजधानी आहे. पॅराग्वे देशापुढचं संकट अधिक बळावतं आहे. त्यात देशातल्या काही जंगलात वणवाही पेटला, त्यानंही गंभीर नुकसान झालं. नासाने अलीकडेच या नदीची आणि आवतीभोवतीच्या परिसराची काही छायाचित्रं प्रसिद्ध केली आहेत. तत्पूर्वी २०१८च्या मध्यावरच दुष्काळाची लक्षणं दिसत आहेत, असं सांगणारी दक्षिण ब्राझीलची काही छायाचित्रं नासानं प्रसिद्ध केली होती. पॅराग्वेसह बोलिविया, उत्तर अर्जेण्टिना या भागात २०२० पर्यंत दुष्काळ असेल असा अंदाजही वर्तवला होता. नासाच्या गोदार्ड स्पेस फ्लाइट सेंटरमधील जलतज्ज्ञ मॅथ्यू रॉडेल सांगतात, २००२ नंतरचा हा दक्षिण अमरिकेतला सगळ्यात मोठा दुष्काळ आहे. २६ ऑक्टोबर २०२० रोजी नासाने प्रसिद्ध केलेल्या चित्रात भूजलपातळी घटलेली दिसते. पॅराग्वे नदीची कमी झालेली जलपातळी ही छायाचित्रं दाखवतातच, पण ७, १५ आणि २६ ऑक्टोबरदरम्यान किती वेगानं जलपातळी घसरली आहे हे सप्रमाण दाखवते आहे. एक नदी आटतेय, तर आसपासच्या जगण्यातला सारा ओलावाही सरत चाललेलं हे वर्तमानातलं भयाण चित्र आहे..