CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 09:25 AM2021-04-27T09:25:28+5:302021-04-27T09:30:01+5:30
CoronaVirus : भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे.
जिनेव्हा : जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस (Tedros Adhanom Ghebreyesus) यांनी सोमवारी भारतातील कोरोना स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. भारतातील कोरोनाची परिस्थिती विदारक असून यावर मात करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून मदत केली जात असल्याचे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटले आहे. (who chief on corona virus crisis said situation in india is beyond heartbreaking)
जागतिक आरोग्य संघटनेकडून जे शक्य आहे, ते सर्व केले जात आहे. महत्वाच्या साधनसामुग्रीचा पुरवठा केला जात आहे, असे टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. तसेच, हजारहून अधिक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाईल फील्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा पुरवठा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
("तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...)
याशिवाय, कोरोना संकटाचा सामना करताना आरोग्य प्रशासनाला मदत करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून २६०० तज्ज्ञ भारतात पाठवण्यात आल्याचेही यावेळी टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी सांगितले. दरम्यान, भारतातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवर वाढ होत असल्याने आरोग्य प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे.
(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)
भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सोमवारी ३ लाख ५२ हजार ९९१ नवे रुग्ण तर २८१२ मृत्यूंची नोंद झाली. ही रुग्णसंख्या जागतिक उच्चांक गाठणारी आहे.