आपलं मूल हुशार असावं, असं सगळ्याच आई - वडिलांना वाटतं. त्यातल्या बहुतेक लोकांना त्यांचं मूल लहान असताना ‘ते काहीतरी विलक्षण हुशार आहे’, याबद्दल खात्री असते. आई-वडील, आजी-आजोबा आणि इतर जवळची माणसं म्हणतात, “तो / ती पहिल्यापासूनच फार हुशार आहे.” - पण प्रत्यक्षात खरंच तसं असतं का? एखादं मूल असं असामान्य हुशार असतं का? किंवा ते खरंच हुशार आहे का, असं मोजण्याची काही पद्धत असते का? तर अशी हुशारी मोजण्याची पद्धत असते. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ ही संस्था दरवर्षी जगभरातील हुशार मुलांचा शोध घेते. यावर्षी त्यांनी जगातील नव्वद देशांमध्ये १६,००० मुलांची परीक्षा घेतली. या परीक्षेचं स्वरूप होतं ते ‘अबव्ह ग्रेड लेव्हल टेस्ट’. म्हणजे एखादं मूल शाळेत ज्या इयत्तेत आहे त्याच्या वरच्या इयत्तांचा किती अभ्यास त्याला समजतो, याची चाचणी. आणि यावर्षीच्या चाचणीत जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ यांनी जगातील हुशार मुलांची जी यादी जाहीर केली त्यात नऊ वर्षांच्या प्रिशा चक्रवर्तीचा समावेश आहे.
ही प्रिशा चक्रवर्ती कोण आहे? - प्रिशा ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील फ्रीमॉन्ट या शहरात राहणारी नऊ वर्षांची लहान मुलगी! ती वॉर्म स्प्रिंग एलिमेंटरी स्कूल नावाच्या शाळेत तिसरीत शिकते. तिने २०२३ सालच्या उन्हाळ्यात ही जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथची परीक्षा दिली होती. या परीक्षेत ती व्हर्बल आणि क्वांटिटेटिव्ह (साधारणतः आपल्याकडच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत ज्याला भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणतात त्या प्रकारची चाचणी) चाचणीत पहिली आली. या चाचणीत तिला पाचवीत शिकणाऱ्या ९९ टक्के मुलांपेक्षा जास्त गुण मिळाले. याचा अर्थ ती तिसरीत शिकत असूनदेखील पाचवीच्या ९९ टक्के मुलांपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने हे विषय समजून घेऊन त्याची चाचणी देऊ शकते.
याच परीक्षेतील इतर चाचण्यांमधील गुणांसाठीही तिचं कौतुक केलं जात आहे. त्यात स्कोलॅस्टिक असेसमेंट टेस्ट, अमेरिकन कॉलेज टेस्टिंग, स्कूल अँड कॉलेज ॲबिलिटी टेस्ट या आणि यांसारख्या इतरही चाचण्यांचा समावेश आहे. जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ यांसारख्या संस्था ज्यावेळी चाचण्या घेतात, त्यावेळी पाठांतर करून त्यात गुण मिळवता येत नाहीत. त्या परीक्षेचा ढाचाच असा असतो, की ज्या मुलाला किंवा मुलीला विषय नीट समजला आहे त्याला किंवा तिलाच त्यात गुण मिळू शकतात. त्यामुळे प्रिशाला मिळालेल्या या सन्मानाचं कौतुक जास्त आहे.
या परीक्षा दिल्यामुळे काय होतं? तर एक म्हणजे एखादं मूल खरोखर किती हुशार आहे याचा अंदाज येतो. त्याच्या क्षमता किती आणि कुठल्या प्रकारच्या आहेत, याचा अंदाज येतो आणि त्याचबरोबर त्या मुलाला इतर काही प्रकारच्या शिक्षणासाठी दारं खुली होतात. म्हणजे या परीक्षेत उत्तम गुण मिळाल्यामुळे प्रिशाला जॉन हॉपकिन्स सेंटर फॉर टॅलेंटेड यूथ या संस्थेच्या इतर अनेक कोर्सेसमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. यात इयत्ता दुसरी ते बारावीपर्यंतच्या हुशार विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या गणित, कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, वाचन आणि लेखन या विषयांचा समावेश आहे. हे कोर्सेस प्रत्यक्ष शाळेत आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतीने घेतले जातात.
याव्यतिरिक्त प्रिशा चक्रवर्ती हिला वयाच्या सहाव्या वर्षीच मेन्सा फाउंडेशन या संस्थेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. मेन्सा फाउंडेशन ही जगातील दोन टक्के बुद्धिमान लोकांची संघटना आहे. या संस्थेचं सदस्यत्व देण्यासाठी स्टँडर्डाइझ केलेल्या आणि सुपरवाईज केलेल्या बुद्धिमत्ता चाचणीचा निकालच केवळ ग्राह्य धरला जातो. ती चाचणी प्रिशाने वयाच्या सहाव्या वर्षी दिली आणि त्यात तिची हुशारी जगातील सर्वोत्तम २ टक्के लोकांइतकी आहे हे सिद्ध झाल्यामुळे तिला मेन्साची मेम्बरशिप देण्यात आली. याव्यतिरिक्त अमेरिकेत नागलीएरी नॉनव्हर्बल ॲबिलिटी टेस्ट घेतली जाते. या चाचणीमध्ये १२ पर्यंतच्या विद्यार्थ्यांची चाचणी घेऊन हुशार आणि दैवी बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांचा शोध घेतला जातो. प्रिशाने त्याही परीक्षेत सर्वोत्तम १ टक्का विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवलं होतं.
ती अभ्यास तर करतेच, पण...प्रिशाचे आई-वडील म्हणतात, ‘ती पहिल्यापासूनच हुशार आहे. अभ्यास करायला आणि शिकायला तिला पहिल्यापासूनच आवडतं.’ मात्र, असं असलं तरीही प्रिशा केवळ पुस्तकी किडा नाही हे विशेष. अभ्यासाव्यतिरिक्त तिला प्रवास करायला आवडतं, जंगलातील रस्त्यावर फिरायला आवडतं आणि मिक्स्ड मार्शल आर्ट्स या खेळाचाही ती सराव करते.