Coronavirus News: वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण: WHO चा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 02:52 PM2021-03-29T14:52:19+5:302021-03-29T14:53:00+5:30
Corona Virus Update: कोरोना विषाणूचं उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं एक विशेष पथक चीनमध्ये दाखल झालं होतं.
कोविड-१९ च्या जागतिक महामारीला (Corona Virus) कारणीभूत ठरलेला विषाणू वटवाघुळांकडून इतर प्राण्यांमध्ये संक्रमित झाला आणि त्यानंतर त्याची मानवाला लागण होऊन तो जगभर पसरला असा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) प्रसिद्ध केला आहे. कोरोना विषाणूचं उगमस्थान आणि प्रसाराची कारणमिमांसा करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं एक विशेष पथक चीनमध्ये दाखल झालं होतं. या पथकानं व्हायरसल संदर्भातील संपूर्ण संशोधन करुन त्याबाबतचा अहवाल 'डब्ल्यूएचओ'कडे सोपवला आहे.
कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेत झाल्याचा आरोप करण्यात आला होता. वुहान प्रांतामध्येच जगातील पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यामुळे यामागे वुहानमधील प्रयोगशाळाच कारणीभूत असल्याचे आरोप केले गेले. डिसेंबर २०१९ रोजी पहिला रुग्ण समोर आल्यानंतर कोरोना व्हायरस संपूर्ण जगभरात वाऱ्याच्या वेगानं पसरला. दुसऱ्याबाजूला कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती लपविल्याचा आरोप चीनवर वारंवार केला जाऊ लागला. दरम्यान, चीननं व्हायरसच्या प्रसाराबाबत हात झटकून याचा प्रसार सी-फूडमधून झाल्याचं जाहीर करुन टाकलं होतं. चीनच्या याच दाव्याचा अभ्यास करण्यासाठी 'डब्ल्यूएचओ'चं पथक चीनमध्ये दाखल झालं होतं.
अहवालाला उशीर का झाला?
एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे की, व्हायरस संदर्भातील काही प्रश्नांची अपेक्षित उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत. पथकानं चीनच्या प्रयोगशाळेतून व्हायरस पसरल्याचा मुद्दा वगळून इतर सर्व पैलूंवर संशोधन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. अहवाल जाहीर करण्यात वारंवार दिरंगाई केली जात आहे. त्यामुळे चीनी सरकार संशोधनात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न तर करत नाहीय ना? असा सवाल उपस्थित केला जात आहे. व्हायरसच्या प्रसारासंबंधिचा अहवाल काही दिवसांतच जाहीर केला जाईल असं डब्ल्यूएचओच्या एका अधिकाऱ्यानं गेल्या आठवड्यात सांगितलं होतं.
संशोधकांनी चार मुद्द्यांवर दिला भर
असोसिएटेड प्रेस (AP) या वृत्तसंस्थेला WHO चे सदस्य देश असलेल्या जिनेव्हा स्थित एका अधिकाऱ्यांपासून अहवालाचा ड्राफ्ट हाती मिळाला. दरम्यान, नेमका हाच अहवाल अंतिम स्वरुपाचा असून तोच जाहीर केला जाईल की नाही याबाबद अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अहवालात चार मुद्द्यांवर सखोल संशोधन झालं असून यातून व्हायरसच्या प्रसाराबाबतची कारणमिमांसा करण्यात आली आहे.
वटवाघळांवरच वैज्ञानिकांना संशय
कोरोना विषाणू थेट वटवाघळांकडून मानवात संक्रमित झाल्याची शक्यता खूप कमी असल्याचा निष्कर्ष वैज्ञानिकांनी मांडला आहे. सुरुवातीला वटवाघळांकडून इतर प्राण्यांमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण झालं. त्यानंतर त्या प्राण्यांच्या माध्यमातून व्हायरस मानवात संक्रमित झाल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. 'कोल्ड चैन फूड प्रोडक्ट्स'च्या माध्यमातून व्हायरचा प्रसार वेगानं झाल्याची शक्यता वैज्ञानिकांनी वर्तवली आहे.