चीनला मसूद अजहरचा एवढा पुळका का?; 'ही' आहे ड्रॅगनची चाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:10 AM2019-03-14T11:10:29+5:302019-03-14T12:27:06+5:30
पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे
जिनिव्हा - पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा म्होरक्या जैश ए मोहम्मद संघटनेचा दहशतवादी मसूद अजहर याला जागतिक दहशतवादी घोषित करण्याला चीनने खोडा घातला आहे. चीनने स्वत: च्या व्हिटो पावरचा वापर करून मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं आहे. फ्रान्स, अमेरिका आणि ब्रिटनसारख्या मोठ्या देशांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत मसूद अजहरच्या विरोधात प्रस्ताव दाखल केला होता. 2017 सालीही चीनने अशाप्रकारे प्रस्तावाला विरोध केला होता. गेल्या 10 वर्षातील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा हा चौथा प्रस्ताव आहे.
नवी दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणावर भाष्य करताना सांगितले की, आम्ही या प्रकारामुळे निराश आहोत, पण सर्व पर्यांयावर आम्ही काम करतोय, भारतीय नागरिकांवर केलेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असणाऱ्या गुन्हेगाराला न्यायालयात उभं करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाला ज्या देशांनी पाठिंबा दिला अशा देशांचा भारत आभारी आहे.
मसूद अजहरला बंदी घालण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदच्या 1267 अलकायदा प्रतिबंध समितीमध्ये फ्रान्स, ब्रिटेन आणि अमेरिका यांनी 27 फेब्रुवारीला आणला होता. 2017 मध्येही चीनने अजहर जागतिक दहशतवादी घोषित करण्यापासून वाचवलं होतं. मसूद अजहरला पाठिशी घालण्याचे काम चीन नेहमी करत आलाय. त्यावेळी चीनने मसूद अजहर आजारी असून आता तो कोणत्याही दहशतवादी कृत्यात सहभागी नसल्याचं सांगितले होते.
चीनच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष
चीन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत व्हिटो पावर असलेला देश आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष चीनच्या भूमिकेकडे लागून राहिलं होतं. कारण याआधीही अनेकदा चीनने भारताच्या प्रयत्नांना खोडा घालण्याचं काम केलं होतं. सुनावणीच्या आधी भारताने अमेरिका आणि फ्रान्सला पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत महत्त्वपूर्ण कागदपत्रे सोपवली होती, मसूद अजहरच्या विरोधात ठोस पुरावे भारताने जमा केले होते.
अनेक दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद
अनेक वर्षापासून भारत संयुक्त राष्ट्र परिषदेत जैशसारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र जैशच्या संस्थापकावर बंदी आणली जात नाही. अजहर पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत बहावलपूरमध्ये वास्तव्य करतो. जानेवारी 2016 मध्ये पंजाबमधील पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ला केला होता. यानंतर भारताने जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेवर बंदी आणण्यसाठी जोरदार हालचाली सुरु ठेवल्या होत्या. यात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटेन या देशांचा भारताला पाठिंबा मिळाला मात्र चीनने विरोध केला.
या कारणांसाठी चीनचा भारताला विरोध
आशिया खंडामध्ये भारताचं वर्चस्व रोखण्यासाठी आणि OBOR प्रकल्पासाठी चीनला पाकिस्तानची गरज
मुस्लिम देश आणि अलिप्त राष्ट्राच्या संघटनेसाठी पाकिस्तानाची चीनला मदत
भारत-अमेरिका यांच्यातील मैत्री, त्यामुळे मसूदसारख्या मुद्द्यांवर भारताला अडकविण्याचा प्रयत्न
तिबेटचे धर्मगुरु दलाई मामा भारताचं समर्थन करतात म्हणून ड्रॅगनची होते चीड