Israel-Hamas War : "एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 03:58 PM2023-10-19T15:58:19+5:302023-10-19T16:01:49+5:30

दहशतवाद्यांनी १०० हून अधिक लोकांना कैद करण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घ्या...

why did hamas took more than 100 israeli hostages what is israel weakness | Israel-Hamas War : "एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

Israel-Hamas War : "एका सैनिकाच्या बदल्यात १००० कैदी", काय आहे इस्रायलची कमजोरी? ज्याचा हमास घेतंय फायदा!

हमास आणि इस्रायलमधील युद्ध १३ व्या दिवशीही सुरू आहे. गाझा पट्टीतून कार्यरत असलेल्या हमास या दहशतवादी संघटनेने दक्षिण इस्रायलवर प्राणघातक हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. या युद्धात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर एकाच वेळी ५ हजारांहून अधिक रॉकेट डागले होते. त्यानंतर अराजकतेचा फायदा घेत १ हजारांहून अधिक दहशतवाद्यांनी सीमा ओलांडून इस्रायलमध्ये प्रवेश केला आणि १०० हून अधिक लोकांचे अपहरण केले आणि त्यांना गाझा पट्टीला परत नेले. 

अपहरण झालेल्यांमध्ये बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत. तसेच, गाझा पट्टीतून इस्रायलमध्ये आलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी अनेक भागात नरसंहार केल्याचेही वृत्त आहे. लहान मुलांनाही जिवंत जाळण्यात आले. अनेकांना त्यांच्या कुटुंबीयांसमोर मारले गेले. पण दहशतवाद्यांनी १०० हून अधिक लोकांना कैद करण्याचे कारण काय? याबद्दल जाणून घ्या...

दरम्यान, १२ वर्षांपूर्वी २०११ मध्ये इस्रायलने आपल्या एका सैनिकाच्या बदल्यात पॅलेस्टाईनच्या १ हजारहून अधिक लोकांना सोडले होते. त्यापैकी असे शेकडो लोक होते, ज्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्यामुळे जन्मठेपेची शिक्षा झाली होती. कैद्यांच्या या देवाणघेवाणीमुळे इस्रायल आपले नागरिक आणि सैनिकांना किती महत्त्व देते, हे स्पष्ट झाले. याचा फायदा आता हमासला घ्यायचा असल्याचे मानले जात आहे.

सन २००६ मध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी बोगद्यातून इस्रायली सैन्याच्या चौकीवर हल्ला केला आणि तिथून इस्त्रायली सैनिक शालित यांचे (Shalit) अपहरण केले. त्यानंतर इस्रायलने शालित यांच्या सुटकेसाठी अनेक लष्करी कारवाया सुरू केल्या, ज्यात दहशतवाद्यांसह शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला, परंतु अपहृत सैनिक शालित यांना सोडवण्यात लष्कराला अपयश आले.

यानंतर गाझावर सत्ता गाजवणाऱ्या हमास या दहशतवादी संघटनेने अपहृत शालित यांच्या बदल्यात इस्रायलमधील पॅलेस्टाईन कैद्यांची अदलाबदल करण्याची मागणी केली, जी इस्त्रायली सरकारने सुरुवातीला नाकारली. पण नंतर हजारो इस्रायलींनी आपल्याच सरकारवर शालित यांना कोणत्याही किंमतीत सोडण्यासाठी दबाव आणला. जर शालित यांच्यासंदर्भात हमास आणि इस्रायल यांच्यात चर्चा झाली नाही तर रॉन अराद सारखेच त्यांचे हाल होतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती. यानंतर इस्रायलने पॅलेस्टाईनमधील १०२७ कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला.

हिजबुल्लाहने रॉन अराद यांचे काय केले?
रॉन अराद हे इस्रायली हवाई दलाचे नेव्हिगेटर होते, जे १९८६ मध्ये लेबनॉनमध्ये पकडले गेले होते. दक्षिण लेबनॉनमध्ये एका कारवाईदरम्यान रॉन अराद यांना पकडण्यात आले होते. पहिल्यांदा रॉन अराद यांना स्थानिक गटाने पकडले आणि नंतर त्यांना हिजबुल्लाहच्या ताब्यात देण्यात आले. इस्रायलने रॉन अराद यांना दहशतवाद्यांच्या तावडीतून सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता, पण इस्त्रायलला आपल्या मिशनमध्ये यश आले नाही. त्यानंतर २००८ मध्ये हिजबुल्लाहने रॉन अराद यांचा मृत्यू झाल्याची घोषणा केली. त्यामुळे शालित यांच्या बाबतीत सुद्धा त्यांची अवस्था रॉन अराद यांच्यासारखी होईल अशी भीती इस्रायलींना होती.

Web Title: why did hamas took more than 100 israeli hostages what is israel weakness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.