नवी दिल्ली- भारतीय उपखंडामधील देशांसाठी सार्कची स्थापना करण्यात आली आहे. मात्र तरिही आणखी एका संघटनेची म्हणजे बिमस्टेकची निर्मिती का करण्यात आली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. तसेच बिमस्टेकमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांचा समावेश करण्यात आलेला नाही.दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटना म्हणजे सार्कचे यश अत्यंत मर्यादित आहे. तसेच पाकिस्तानने सार्कमध्ये नेहमीच असहकाराची भूमिका घेतली आहे. पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवादाला आणि दहशतवादी छावण्यांना मोकळीक दिल्यामुळे भारताने सार्क परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यामुऴे सार्कचे क्षेत्र अत्यंत आकुंचित पावले आहे. त्यामुळेच भारताने बिमस्टेकला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांनी जर पाकिस्तानने जर आपल्या भूमिकेत बदल केला नाही तर पाकला वगळून प्रादेशिक संघटना बनवावी लागेल असे स्पष्ट केले होते. त्यामुळेच बिमस्टेकसारखी संघटना उभी राहिली. आज पाकिस्तान भारतीय उपखंडात इतर देशांपासून वेगळा पडल्याचे दिसून येते.
सात देशांचे बिमस्टेक संघटन6 जून 1997 रोजी बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोअपरेशन म्हणजेच बिमस्टेकची स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय बांगलादेशची राजधानी ढाका येथे आहे. यामध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान, नेपाळ यांचा समावेश होता. नंतर डिसेंबर महिन्यामध्ये त्यात म्यानमारचा समावेश करण्यात आला. या देशांमध्ये जगातील एकूण लोकसंख्येच्या 22 टक्के लोकसंख्या राहाते. बँकॉक येथे बिमस्टेकच्या गटामार्फत सर्व सदस्य देशांच्या सरकारांशी संपर्क ठेवला जातो. आजवर बिमस्टेकच्या तीन शिखप परिषदा झाल्या आहेत तर मंत्री आणि अधिकारी पातळीवरील अनेक बैठका झाल्या आहेत.
सदस्य देशांच्या नावाच्या क्रमानुसार या संघटनेचे अध्यक्षपद मिळते. सर्वप्रथम बांगलादेशकडे 1997-99 या काळासाठी अध्यक्षपद होते. त्यानंतर म्यानमार 2001-02, श्रीलंका 2002-03, थायलंड 2003-05. बांगलादेश 2005-06 असे अध्यक्षपद होते. भूतानने नकार दिल्यानंतर 2006-09 या कालावधीसाठी भारताकडे या परिषदेचे अध्यक्षपद होते. हे सर्व देश एकमेकांना 14 विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य करतील. त्यात टेलिकॉम, गुन्हे तपासणी, कृषी, पर्यावरण, दहशतवाद उच्चाटन, गरिबी निर्मूलन अशा विषयांचा त्यात समावेश आहे. भारत आणि आग्नेय आशियातील देशांचा संपर्क व व्यापार वृद्धींगत होत आहे.