मुंबई - जगभरातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम सेवा ठप्प झाली आहे. बुधवारी रात्रीपासून फेसबुकवर तांत्रिक कारणामुळे अनेक अडचणींचा सामना युजर्संना करावा लागत आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम पाठोपाठ व्हॉट्सअपला तांत्रिक अडचणी येत असल्याचे समोर येतंय.
फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की, आम्हाला माहीत आहे की, काही लोकांना फेसबुक सुरु होण्यासाठी अडचणी येत आहेत. आम्ही लवकरात लवकर ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर इन्स्टाग्राम अधिकाऱ्यांनी ट्विट केलं की, युजर्सची समस्या आम्ही समजू शकतो, आमची तांत्रिक टीम या समस्येचं निरसन करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. गुरुवारी सकाळपासून ट्विटरवर #FacebookDown आणि #InstagramDown असा ट्रेंड सुरु आहे. तर दुसरीकडे अमेरिका आणि युरोपमधील काही भागात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअप या तिन्ही सोशल मिडीया सेवा ठप्प झाल्या आहेत.
फेसुबकच्या इतिहासात दुसऱ्यांदा अशाप्रकारे तांत्रिक अडचणींचा सामना युजर्सना सहन करावा लागत आहे. याआधी 2008 मध्ये फेसबुकवर तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. त्यावेळी 15 लाख फेसबुक युजर्स होते मात्र आज जवळपास ही युजर्स संख्या 2 अब्जापर्यंत पोहचली आहे. मागील काही वर्षात फेसबुक युजर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास ही समस्या समोर आली. अद्यापही तांत्रिक समस्या सोडविण्यात फेसबुकला यश आलं नाही. सुरुवातील युजर्सना फेसबुक, इन्स्टाग्राम यावर साइटवर पोस्ट अपलोड करण्यात अडचणी येत होत्या. फेसबुकवर येत असलेल्या अडचणींवर ट्विटरवरुन युजर्सने संताप व्यक्त केला आहे.
फेसबुकपाठोपाठ युजर्सना व्हॉट्सअपमध्ये समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही लोकांना व्हॉट्सअपवरुन फोटो, व्हिडीओ आणि संदेश पाठविण्यात अडचण येत असल्याचं सांगितलं जातंय. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप या तिन्ही सेवांचे अधिकार सध्या फेसबुककडे आहे. तसेच फेसबुक जाहिरातदारांना आम्ही पैसे परत देऊ अशी माहिती फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा कुठलाही सायबर हल्ला नसल्याचे फेसबुककडून स्पष्ट करण्यात आले
दरम्यान, फेसबुककडून यासंदर्भात कोणतेही भाष्य करण्यात आलेली नाही. हा बिघाड नेमका कशामुळे झाला आणि तो व्यवस्थित होण्यासाठी किती काळ जावा लागेल, याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. लाखो फेसबुक युजर्सचं अकाऊंट सुरू होत नाहीय, तर अनेकांना लाईक आणि कमेंट करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय इन्स्टाग्रामवरही फोटो अपलोड करताना त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र अनेक युजर्सने फेसबुक समस्येची खिल्ली उडवली आहे.