न्यूयॉर्क : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. या रोगावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देशांमधील संशोधक अथक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना यश आले तर पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ही लस प्रत्यक्षात आली असेल, असा विश्वास अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी व्यक्त केला आहे.
विषाणूशास्त्र या विषयातील जाणकार डॉ. लॉरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले की, या भयंकर रोगावर औषध शोधणे हे एक मोठे आव्हानच आहे परंतु मला खात्री आहे की, आपले संशोधक यात यशस्वी ठरतील. येणारी लस कोणत्याही कंपनीची असो हा शोध क्रांतीकारक असेल. मात्र, यासाठी आपल्याला येत्या जानेवारापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.
नॅशनल इन्सिट्यूट आॅफ हेल्थच्या अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला म्हणाले की, अनेक ठिकाणी लसीच्या चाचणीचा पहिला तर काही ठिकाणी दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषध निर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सगळ्यांचा आपसात समन्वय असणे आवश्यक आहे. सध्या अनेक प्रकारची आकडेवारी देऊन लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गरजेचेही आहे परंतु जेव्हा लसीचा शोध लागेल तो दिवस सगळ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल. (वृत्तसंस्था)