अफगाणिस्तानातून माघार घेणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:53 AM2017-08-23T00:53:47+5:302017-08-23T00:54:18+5:30
सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे
वॉशिंग्टन : सर्वात दीर्घ युद्ध संपवून अफगाणिस्तानातून माघार घेण्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. शिवाय अतिरेक्यांना आश्रय देणा-या पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत सुनावले आहे की, जर त्यांनी अतिरेक्यांची मदत सुरूच ठेवली, तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. युद्धग्रस्त अफगाणिस्तानात शांतता स्थापन करण्यासाठी भारताने आणखी सहकार्य करावे, असेही आवाहन ट्रम्प यांनी केले.
ट्रम्प यांनी दक्षिण आशियाबाबतचे आपले नवे धोरण सोमवारी रात्री जाहीर केले. ते म्हणाले की, जगातील सर्वात मोठा लोकशाही देश भारत हा अमेरिकेचा प्रमुख सुरक्षा आणि आर्थिक सहकारी आहे. अफगाणिस्तानात स्थिरता आणण्यासाठी भारताने दिलेल्या योगदानाची त्यांनी प्रशंसा केली, पण भारत अमेरिकेकडून व्यापारात अब्जावधी डॉलर कमावतो. त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की, भारताने आर्थिक सहकार्यात मदत वाढवावी. वस्तू आणि सेवा क्षेत्रात भारत आणि अमेरिका यांचा द्विपक्षीय व्यापार २०१६ मध्ये वाढून ११४ अब्ज डॉलर झाला आहे. हा व्यवहार २०१४ मध्ये १०४ अब्ज डॉलर होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी मागील वर्षी संयुक्तपणे हेरात प्रांतात एका ऐतिहासिक प्रकल्पाचे उद्घान केले होते. भारताची ही १७०० कोटींची योजना आहे. (वृत्तसंस्था)
पाकला दिला इशारा - अनागोंदी आणि अराजकता माजविणाºया एजंटांना आश्रय देणाºया पाकिस्तानला ट्रम्प यांनी इशारा दिला. ही कृती तुम्हाला महागात पडेल. अमेरिकेकडून पाकिस्तानला अब्जावधींची मदत दिली जाते.
पण पाकिस्तान अतिरेक्यांना सातत्याने आश्रय देत आहे. त्यामुळे आता आम्ही
शांत बसणार नाही, असे सांगून ते म्हणाले की, पाकिस्तान आणि भारत दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज असल्याने धोका आणखी वाढला आहे.
अफगाण राजदूतांनी केले स्वागत
अमेरिकेने घेतलेल्या भूमिकेचे अफगाणिस्तानच्या वॉशिंग्टनमधील दूतावासाने स्वागत केले आहे. अतिरेक्यांना आश्रय देणाºया पाकिस्तानला ट्रम्प यांनी गंभीर परिणामांचा इशारा दिल्याबद्दल, राजदूत हमदुल्ला मोहिब यांनी ट्रम्प यांचे आभार मानले.
चीन पाकच्या बाजूला
बीजिंग : ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाºयानंतर, चीन लगेच पाकिस्तानच्या बचावासाठी पुढे आला. चीनने म्हटले आहे की, पाकिस्तान नेहमीच दहशतवादाविरुद्ध लढाईत पुढे असतो. पाकिस्तानने दहशतवादाविरुद्धच्या लढाईत मोठा त्याग केला आहे. शांतता आणि स्थिरतेसाठी योगदान दिले आहे.
काबुल : युद्धग्रस्त अफगाणिस्तानात हजारो सैनिक पाठविण्याचा मार्ग ट्रम्प यांनी मोकळा केल्याबद्दल, तालिबानने संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेसाठी अफगाणिस्तान स्मशानभूमी बनून जाईल, असा इशारा देताना तालिबानने म्हटले आहे की, अमेरिकेने अफगाणिस्तानातील सैनिक न हटविल्यास, या महाशक्तीसाठी अफगाणिस्तान स्मशानभूमी झालेला असेल.
युद्ध सुुरू ठेवण्याऐवजी अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याबाबत अमेरिकेने विचार करायला हवा. जोपर्यंत अमेरिकेचा एकही सैनिक आमच्या भूमीवर असेल, तोपर्यंत आमचा जिहाद सुरूच राहील. ट्रम्प यांच्या धोरणानंतर काही मिनिटांतच अतिरेक्यांनी काबुलस्थित अमेरिकी दूतावासावर रॉकेट हल्ला केला. अमेरिका पूर्ण मुस्लीम समुदायाला मिटवू पाहत असल्याचा आरोप तालिबानने केला आहे.
भारताने केले स्वागत
ट्रम्प यांच्या धोरणाचे भारताने स्वागत केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले की, शांतता, सुरक्षा, स्थिरता आणि समृद्धीसाठी भारताचा अफगाणिस्तान सरकार आणि तेथील नागरिकांना पाठिंबा असेल. अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणासाठी आणि विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.