मॉस्को - मध्य आशियातील अर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये सध्या जबरदस्त संघर्ष सुरू आहे. नागोर्नो-काराबाख या वादग्रस्त भूभागावरून सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत हजारो सैनिक आणि नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या संघर्षाबाबत जगभरातून चिंता व्यक्त होत असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी मोठं विधान केलं आहे. एकेकाळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या रशियाशेजारील या दोन देशात सुरू असलेल्या संघर्षात रशियाने कुठल्याही देशाची बाजू घेतली नव्हती. मात्र आता पुतीन यांनी केलेल्या विधानामुळे युद्धाच्या पुढील वाटचालीबाबत गंभीर संकेत मिळाले आहेत.रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील संघर्षाबाबत म्हणाले की, हे युद्ध विनाशकारी आहे. मला या संघर्षामुळे गंभीर चिंता वाटू लागली आहे. अझरबैजान, अर्मेनिया आणि नागोर्नो-काराबाखमधीली नागरिक हे आमच्यासाठी अनोळखी नाहीत. दरम्यान, पुतीन यांनी अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यासोबत नागोर्नो-काराबाखचा वेगळा उल्लेख केल्याने त्यामधून विविध अर्थ काढले जात आहेत.
दरम्यान, पुतीन यांनी या भयंकर संघर्षात रशिया कुठल्या देशाच्या बाजूने उभा राहील याचेही संकेत दिले आहेत. रशिया अर्मेनियाला कधी साथ देणार या प्रश्नाला उत्तर देताना पुतीन यांनी सांगितले की, अर्मेनियावर पहिला हल्ला झाल्यानंतर लगेच. तुम्हाला माहितच आहे की अर्मेनियासोबत आमचा संयुक्त सुरक्षा करार झालेला आहे. सध्या युद्ध हे अर्मेनियाच्या सीमेबाहेर होत आहे. अर्मेनियाच्या जमीनीवर हल्ला होताच आम्ही या कराराचे पालन करू.दरम्यान, अर्मेनिया आणि अझरबैजानच्या परराष्ट्र मंत्र्यांना पुतीन यांनी शांतता चर्चेसाठी मॉस्कोमध्ये येण्याचे निमंत्रण दिले आहे. तसेच मानवतावादी दृष्टीकोनातून नागोर्नो-काराबाखमधील लढाई थांबली पाहिजे असे आवाहनही व्लादिमीर पुतीन यांनी केले.सुमारे दोन आठवडे सुरू असलेल्या संघर्षानंतरही युद्धाची अखेर होत नसल्याचे संकेत मिळाल्यानंतर रशियाने या दोन्ही देशांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. दरम्यान, या संघर्षात हजारो सैनिकांसह सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला आहे.