जगभरात अनेक रोग पसरले आहेत, ज्याचे मूळ वटवाघुळ असल्याचे अनेक शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कोरोनासारखा विषाणूही याच वटवाघुळातून आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वटवाघुळापासून लोक दूर पळतात. पण, एका महिलेने चक्क वटवाघुळाचा सूप प्यायल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्या महिलेला अटक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला एका महिला शिक्षिका आणि यूट्यूब क्रिएटर आहे. तिने वटवाघळांचा सूप पितानाचा व्हिडिओ अपलोड केला आहे. महिलेला तिच्या या कृत्यासाठी 5 वर्षे तुरुंगवास भोगावा लागू शकतो किंवा 11 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. मात्र, महिलेने यासाठी माफीदेखील मागितली आहे. अशा कृत्यामुळे पुन्हा साथीचे रोग सुरू होण्याचा धोका असू शकतो, अशी शक्यता अनेक आरोग्य तज्ञांनी व्यक्त केली आहे.
महिलेने माफी मागितली
रिपोर्टनुसार, या महिलेला 9 नोव्हेंबर रोजी थायलंडच्या ईशान्येला असलेल्या साखोन नाखोन प्रांतातून अटक करण्यात आली होती. थायलंडच्या वन्यजीव कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी या महिलेला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी सांगितले की जेव्हा महिलेला अटक करण्यात आली, तेव्हा तिने तिच्यावरील आरोप स्पष्टपणे नाकारले. मात्र, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये महिलेने माफी मागितली. तिने वचन दिले की, ती यापुढे कधीही वटवाघुळ खाणार नाही.
वटवाघुळ खाण्याचे अनेक धोके चुलालॉन्गकॉर्न युनिव्हर्सिटीच्या मेडिसिन फॅकल्टीमधील प्रोफेसर तिरावत हेमाजुता यांनी सांगितले की, लोकांनी वटवाघुळ खाऊ नये, कारण त्यात अनेक बॅक्टेरिया असतात. यामुळे ते आजारी पडू शकतात आणि महामारीही सुरू होऊ शकते. वटवाघुळ नीट शिजवलेले असले, तरीही लोकांना संसर्ग होण्याचा धोका असतो.