उशीखाली मोबाइल ठेवून झोपी गेली महिला अन् पहाटे झालं होत्याचं नव्हतं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 01:28 PM2019-03-29T13:28:21+5:302019-03-29T13:28:46+5:30
अनेक जण जाणूनबुजून स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून झोपतात, परंतु ते आपल्यासाठी घातकही ठरू शकते.
जोहोर- टेक्नॉलॉजीच्या जमान्यात मोबाइल हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तरुणाईसह आता वरिष्ठ मंडळीही तासनतास मोबाइलमध्येच व्यस्त असतात. व्हॉट्सअॅप, फेसबुक यांसारख्या देवाणघेवाणीच्या प्रभावी माध्यमांमुळे हल्ली लोकांचा मोबाइलद्वारेच संपर्क वाढला आहे. मोबाइलद्वारे यू ट्युब अथवा नेटफ्लिक्सच्या माध्यमातून वेब सीरिजही पाहण्याचं हल्ली अनेकांना व्यसन जडलं आहे.
अनेक जण जाणूनबुजून स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून झोपतात, परंतु ते आपल्यासाठी घातकही ठरू शकते. मलेशियामध्ये वास्तव्याला असलेल्या 58 वर्षीय महिलेबरोबरही अशीच काहीशी घटना घडली आहे. ती महिला स्वतःच्या उशीखाली मोबाइल ठेवून निद्राधीन झाली. अर्ध्या तासानंतर पहाटे 4.30 वाजता उशीच्या खालून जोरात फटाके फुटण्यासारखा आवाज आला. महिलेला काळोखात फक्त जमिनीवर आगीची ठिणगी दिसली. तिने धावत-पळत जात लाइट लावली आणि पाहिलं तर काय जमिनीवर पेटत असलेली ती आग तिच्या मोबाइल फोनला लागली होती.
तो फटाक्यांसारखा आवाजही मोबाइलच्या स्फोट झाल्याचा असल्याचं तिच्या नंतर लक्षात आलं. महिलेनं सांगितलं की, मी रात्री 4 वाजता मोबाइलचा वापर केला होता. त्यानंतर नेहमीप्रमाणे तो उशीखाली ठेवला. मी फोन चार्जिंगला लावून त्याचा वापर केला नव्हता किंवा मोबाइल रात्रभर चार्जिंगलाही लावला नाही, तरीही हा स्फोट झाला. महिला हा फोन 6 वर्षांपासून वापरत होती.