काबुल – अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबानने(Taliban) सत्ता स्थापन केल्यानंतर आता सरकारमध्ये महिलांना स्थान द्यावं यासाठी काही महिलांनी निदर्शने केली आहेत. परंतु तालिबानच्या नव्या सरकारमध्ये कुठेही महिलांना स्थान देण्यात येणार नाही. महिला मंत्री बनवणार नाही. महिलांनी फक्त मुलं जन्माला घातली पाहिजे असं तालिबानी प्रवक्त्याने स्थानिक माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.
स्थानिक माध्यम टोलो न्यूजने तालिबानी प्रवक्त्याच्या हवाल्याने म्हटलंय की, एक महिला मंत्री असू शकत नाही. एखाद्या गळ्यात काही तरी घातलं जातंय पण ते सांभाळू शकत नाही असा हा प्रकार आहे. एका महिलेसाठी कॅबिनेटमध्ये असणं गरजेचे नाही. त्यांनी फक्त मुलं जन्माला घालावीत. महिला आंदोलक संपूर्ण अफगाणिस्तानाचं प्रतिनिधित्व करत नाहीत असं त्यांनी सांगितले आहे.
सरकारमध्ये सहभागासाठी महिलांचे आंदोलन
अफगाणिस्तानात तालिबानी सत्ता आल्यानंतर सर्वसामान्य जनतेचे दहशतीचं चित्र निर्माण झालं आहे. परंतु काही दिवसांपासून काबुलसह अन्य शहरात तालिबानी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहेत. विशेष म्हणजे या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. तालिबानींना हे आंदोलन आवडत नाही. त्यामुळेच आंदोलन करणाऱ्या महिला, सर्वसामान्य आणि त्या आंदोलनाचं कव्हरेज करणाऱ्या पत्रकारांवर तालिबानींचा राग आहे. तालिबानद्वारे सरकार स्थापनेची घोषणा केल्यानंतर काबुलसह विविध ठिकाणी महिलांचे आंदोलन सुरु आहे. सरकारमध्ये सहभागाची महिला आंदोलक मागणी करत आहेत.
महिलांद्वारे करण्यात येत असलेले आंदोलन खूप लहान आहे परंतु तालिबानला त्यामुळे धक्का बसला आहे. तालिबानींनी महिलांना मारहाण केली. त्याठिकाणी पत्रकारांना मारलं आता सरकार स्थापन झाल्यानंतर तालिबानने विना सरकारच्या परवानगीशिवाय कुठलंही आंदोलन करण्यास मज्जाव घातला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात तालिबानी महिलांना मारहाण करत आहेत. तालिबानी महिला आणि पत्रकारांना दांडक्याने आणि रायफलने मारहाण करत आहेत. त्यासोबत काही पत्रकारांना अटकही करण्यात आली आहे.
अफगाणिस्तानात तालिबान सरकारची स्थापना झाल्यानंतर तालिबानींनी काबुलनजीक नॉर्वेचं दूतावास कार्यालयावर कब्जा केला आहे. त्याठिकाणी दारुच्या बोटल्स फोडणे. तिथे असलेले पुस्तकं नष्ट करण्याचं काम तालिबानींनी केले आहे. इराणमध्ये नॉर्वे राजदूतानं ट्विट करुन म्हटलं की, तालिबानने काबुलजवळील नॉर्वे दूतावास कार्यालयावर कब्जा केला आहे. ते पुन्हा आम्हाला परत करतील असं सांगितलं आहे. परंतु याठिकाणी दारुच्या बाटल्या फोडणे. लहान मुलांची पुस्तकं नष्ट करणे हे धोकादायक आहे असं त्यांनी सांगितले आहे.