जगातील सर्वाधिक तेल उत्पादक सौदी अरेबियानं केली मोठी घोषणा, २०६० पर्यंत बनणार 'झीरो कार्बन उत्सर्जन' करणारा देश!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 03:25 PM2021-10-23T15:25:23+5:302021-10-23T15:25:39+5:30
जगातील सर्वात मोठा तेल निर्यात देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आता झीरो कार्बन उत्सर्जनावर भर देणार असल्याची घोषणा केली आहे.
जगातील सर्वात मोठा तेल निर्यात देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियानं आता झीरो कार्बन उत्सर्जनावर भर देणार असल्याची घोषणा केली आहे. ग्लासगो, स्कॉटलँडमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या जागतिक हवामान परिषदेपूर्वीच सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. २०६० सालापर्यंत सौदी अरेबियाचा झीरो कार्बन ग्रीन हाऊसमध्ये समावेश होईल, असा दावा त्यांनी केला आहे. जगाला हवामान बदलाच्या धोक्यांपासून वाचविण्यासाठी अनेक देश एकत्र आले असून झीरो कार्बन उत्सर्जन मोहिमेत सहभाग घेतला आहे. यात आता सौदी अरेबियानंही मोठ्या प्रमाणात काम करण्याची तयारी केली आहे.
नेट झीरो कार्बन मिशनचा उद्देश सौदी अरेबियाला आता तेल उत्पादन बंद करावं लागणार असा नाही. तर यूनायटेड नेशन्सच्या अकाऊंटिंग नियमांनुसार सौदी अरेबियातून निर्यात होणाऱ्या तेलामुळे परदेशांमध्ये जितकं कार्बन निर्माण होणार त्यासाठी सौदी अरेबिया जबाबदार असणार नाही. सौदी अरेबियात जितका कार्बन उत्सर्जन होत आहे त्याचं प्रमाण शून्यावर आणण्याचा संकल्प मोहम्मद बिन सलमान यांनी केला आहे.
उत्पादनातही होईल वाढ
सौदी अरेबियान लवकरच कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ करणार आहे. सध्या १२ मिलियन बॅरल इतक्या कच्च्या तेलाचं उत्पादन दैनंदिन पातळीवर करत आहे. आता ते वाढून १३ मिलियन बॅरल करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुढील सहा वर्षांमध्ये हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यानंतरच सौदी अरेबिया दैनंदिन पातळीवर १३ मिलियन बॅरल कच्चं तेल उत्पादन करु शकेल.
सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था मुख्य स्वरुपात तेल आणि गॅसवर आधारित आहे. सध्या जगातील सर्वाधिक कार्बन उत्सर्जन देशांच्या यादीत सौदी अरेबिया १० व्या क्रमांकावर आहे.