संयुक्त राष्ट्रे : हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जागतिक स्तरावर जनचळवळ उभी राहिली पाहिजे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांनी न्यूयॉर्क येथे आयोजिलेल्या हवामानविषयक परिषदेत ते बोलत होते.पॅरिसमधील परिषदेत झालेल्या हवामानविषयक करारातील तरतुदींशी प्रामाणिक राहून भारताने १७५ गिगावॅट इतके बिगरजीवाश्म इंधन उत्पादित करण्याचे लक्ष्य राखले आहे अशी घोषणा नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात केली होती. तो धागा पकडून मोदी म्हणाले की, बिगरजीवाश्म साधनांतून २०२२ सालापर्यंत १७५ गिगावॅट अपारंपारिक उर्जेची निर्मिती करण्यात येईल व हे प्रमाण कालांतराने ४०० गिगावॅटपर्यंत वाढवण्यात येईल.ह्यूस्टन येथे रविवारी झालेल्या हाऊडी मोदी या कार्यक्रमाला मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित होते. दोन्ही देशांचे संबंध दृढ होण्यासाठी या कार्यक्रमाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची भावना या नेत्यांनी व्यक्त केली होती. मात्र हवामान बदलाबाबत अमेरिका व भारताचा दृष्टीकोन वेगळा आहे. पॅरिसच्या हवामान करारातून २०१७ साली अमेरिकेने अंग काढून घेतले होते. भारत व चीनच्या कृत्यांमुळे आम्हाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे असा आरोप त्यावेळी ट्रम्प यांनी केला होता. या करारामुळे सर्वाधिक फायदा होणाऱ्या देशांना अधिक पैसे देण्याची पाळी अमेरिकेवर येईल असा आक्षेप ट्रम्प यांनी घेतला होता.आता चर्चा नको, तर कृती हवीनरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या संकटावर मात करायची असेल तर त्यासाठी सध्या सुरू असलेले प्रयत्न तोकडे आहेत हे आपण आधी मान्य केले पाहिजे. चर्चा करण्याचे दिवस संपले, आता कृती करण्याची वेळ आली आहे.
‘हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जागतिक जनचळवळ हवी’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 2:50 AM