वॉशिंग्टन- जगातील सर्वात मोठा हिमखंड नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 18 वर्षांपूर्वी अंटार्क्टीकाच्या रॉस आईस शेल्फपासून हा हिमखंड बाजूला झाला आहे. हा हिमखंड आता नष्ट होणार असल्याचे नासाने म्हटले आहे. या हिमखंडाचे नाव बी-15 असे होते. 2000 साली मार्च महिन्यामध्ये हा हिमखंड रॉस आईस शेल्फपासून बाजूला झाला. 296 किमी लांब आणि 37 किमी रुंद असणाऱा हिमखंड जगातील सर्वात मोठा होता असे नासाने जाहीर केले होते. मात्र हिम वितळल्यामुळे त्याचे अनेक लहान तुकड्यांमध्ये विभाजन झाले. यातील अनेक हिमखंड बाजूला वाहात गेले.
यावर्षी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या संशोधकांनी या हिमखंडाचे 22 मे रोजी छायाचित्र घेतले होते. त्यावेळेस बी15झेड या खंडाची लांबी 18 किमी इतकी उरली होती आणि 9 किमी रुंद होती. याचे असेच तुकडे होत राहिले तर लवकरच तो नष्ट होईल असे संशोधकांनी सांगितले होते. या हिमखंडावर अनेक भेगा दिसत असल्याचे निरीक्षणही संशोधकांनी सांगितले होते. जर याचे असेच तुकडे होत राहिले तर त्याचा माग घेणे अशक्य होणार आहे. मे 2018मध्ये हा हिमखंड साऊथ जॉर्जिया बेटांपासून वायव्येस 277 किमी अंतरावर होता.