जगभरात सर्वाधिक शक्तिशाली आहे 'या' देशाचा पासपोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2017 07:40 AM2017-10-26T07:40:06+5:302017-10-26T07:40:44+5:30
सिंगापूर- जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे.
सिंगापूर- जगातील सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट म्हणून सिंगापूरच्या पासपोर्टला पसंती देण्यात आली आहे. अनेकविध देशांच्या पासपोर्टची एकमेकांशी तुलना केली असता सिंगापूरचा पासपोर्ट हा ताकदवान आहे, असं ग्लोबल पासपोर्ट इंडेक्सच्या माहितीतून उघड झालं आहे. जागतिक स्तरावरच्या या स्पर्धेत 193 देशांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. यामध्ये भारताचा क्रमांकात सुधारणा झाली असून, त्यानं 78वरून तो 75 क्रमांकावर झेप घेतली आहे. जर्मनी दुसऱ्या स्थानी असून, स्वीडन आणि दक्षिण कोरिया अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर झेपावले आहेत.
विशेष म्हणजे यादीतील पहिल्या 10 क्रमांकावर युरोपियन देशांचंच प्रभुत्व असायचे. परंतु यंदा पहिल्यांदाच आशियाई देशांनी या यादीत स्थान मिळवलं आहे. गेल्या काही वर्षांपासून नागरिक एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर करत असून, काही अंशी त्यांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शिक्षण, नोकरी यासारख्या गोष्टींसाठी लोक देश सोडून परगावी जात असल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे अनेकांना तात्काळ व्हिसा मिळणंही गरजेचं असतं.
सिंगापूरमधील नागरिकांना 159 देशांचा व्हिसा सहजरीत्या (व्हिसा फ्री) मिळू शकतो. त्यानंतर जर्मनीतल्या नागरिकांना 158 देशांचा व्हिसा उपलब्ध होतात. स्वीडन आणि दक्षिण कोरियामधील नागरिकांना 157 देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. तर भारतातील नागरिकांना 51 देशांचे व्हिसा सहज देण्यात येतात. गेल्या दोन वर्षांपासून या स्पर्धेत जर्मनी सातत्यानं पहिला क्रमांक राखून होती, परंतु यंदा त्या देशाला दुस-या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.