सिंगापुरात होणार जगातील सर्वांत उंच पूर्वनिर्मित टॉवर; बांधणीचे काम मात्र सुरू आहे मलेशियात!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 06:47 AM2020-08-11T06:47:58+5:302020-08-11T06:48:04+5:30
पूर्वनिर्मित इमारतींचे सुटे भाग एका ठिकाणी तयार करून नंतर प्रत्यक्ष बांधकाम स्थळी नेऊन जुळविले जातात. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी फार गर्दी न होता, बांधकाम करणे त्यामुळे शक्य होते.
नवी दिल्ली : सिंगापुरातील गर्दीच्या बुकित मेराह जिल्ह्यात जगातील सर्वाधिक उंच ‘पूर्वनिर्मित’ (प्रीफॅब्रिकेटेड) गगनचुंबी इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीची प्रत्यक्ष निर्मिती मात्र मलेशियात सुरू आहे.
पूर्वनिर्मित इमारतींचे सुटे भाग एका ठिकाणी तयार करून नंतर प्रत्यक्ष बांधकाम स्थळी नेऊन जुळविले जातात. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी फार गर्दी न होता, बांधकाम करणे त्यामुळे शक्य होते.
सिंगापुरात उभ्या राहणाऱ्या या पूर्वनिर्मित इमारतीत १९२ मीटर (६३0 फूट) उंचीचे दोन जुळे टॉवर आहेत. अॅव्हेनू साऊथ रेसिडेन्स नावाचा हा प्रकल्प निवासी आहे. मलेशियातील सेनई येथे त्याची बांधणी सध्या केली जात आहे. षटकोणी बॉक्सच्या आकारातील मोड्यूल्स सेनई सुविधा केंद्रात बांधले जात आहेत. हे मोड्यूल्स नंतर सिंगापुरात नेऊन जुळविले जातील. ही इमारत २,४५,९७५ चौरस फूट जागेवर बांधली जात आहे. यात ८ व्यावसायिक संकुल आहेत. ५६ मजली इमारतीत १८ नभोद्याने (स्काय गार्डन) आहेत.
गर्दी टाळण्यासाठी...
इमारत जिथे प्रत्यक्षात उभी राहणार आहे, तिथे कोणत्याही अडथळ्याशिवाय अल्पावधीत इमारत उभी करणे या पद्धतीत शक्य होते. सध्याच्या कोविड-१९ महामारीच्या काळात निवासी परिसरात गर्दी टाळणे आवश्यक आहे. हा हेतूही या पद्धतीत साध्य होत आहे. कारण प्रत्यक्ष इमारत स्थळी फारच थोड्या लोकांची गरज यात लागते.