जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 08:24 AM2024-11-23T08:24:41+5:302024-11-23T08:26:26+5:30

सदैव चिरतरुण राहण्यासाठी झटणाऱ्या ब्रायनची काही दिवसांपूर्वी भयानक छायाचित्रं प्रसिद्ध झाली. त्यात त्याच्या डोळ्यांच्या कडा, चेहरा सुजलेला दिसतो.

Worldwide: Fat 'injection' to be 'eternal'! | जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!

बालपण-तारुण्य-प्रौढत्व-वृद्धावस्था हे माणसाच्या आयुष्यातले नैसर्गिक टप्पे आहेत. हे टप्पे कोणीही टाळू शकत नाही. उत्तम आरोग्य राखण्यासाठी प्रयत्न करणे, त्यासाठी आरोग्यदायी जीवनशैलीचे अनुसरण एवढी एकच गोष्ट करणं माणसाच्या हातात आहे. पण अमेरिकेतला ब्रायन जाॅन्सन मात्र सर्वसामान्यांसारखा नाही. त्याने संपूर्ण लक्ष स्वत:च्या आरोग्यावर केंद्रित केलं आहे. जगभरात ब्रायनची ओळख ‘बायोहॅकर’ अशीच आहे. 

सदैव चिरतरुण राहण्यासाठी झटणाऱ्या ब्रायनची काही दिवसांपूर्वी भयानक छायाचित्रं प्रसिद्ध झाली. त्यात त्याच्या डोळ्यांच्या कडा, चेहरा सुजलेला दिसतो. तरुण दिसण्याच्या प्रयत्नातल्या एका प्रयोगाची ॲलर्जी आल्यामुळे हे झालं असल्याची कबुली ब्रायनने दिली आहे. या प्रयोगात त्याच्या चेहऱ्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरातली चरबी इंजेक्शनद्वारे टोचण्यात आली. त्यानंतर अवघ्या तीस मिनिटांच्या आत ब्रायनला ओळखणारे त्याला ओळखणार नाहीत इतका त्याचा चेहरा बदलून गेला. चेहऱ्यावर इतकी सूज आली की, त्याला काही काळ दिसेनासं झालं होतं. तरीही ब्रायन विचलित झाला नाही. 

काही वर्षांपूर्वी ब्रायनने मृत्यूशी युद्ध पुकारलं. त्यासाठी त्याने ‘ब्ल्यू प्रिंट’ नावाचा एक प्रकल्प सुरू केला. तो आणि त्याच्या टीमने दीर्घायुष्य, एजिंग यावर उपलब्ध असलेल्या सर्व शास्त्रीय साहित्याचा बारकाईने अभ्यास केला. यासाठी उपलब्ध उपचार पद्धतींपैकी ब्रायनने उष्मांकांवर निर्बंध घालण्याची पद्धत सर्वात आधी अवलंबली. त्याने रोजच्या आहारातून उष्मांक बाद करण्याचा पर्याय स्वीकारला. त्याचा परिणाम म्हणजे तो खूपच बारीक झाला. थकलेला, आळसावलेला दिसू लागला. मृत्यूच्या दारात उभा असल्यासारखा भासू लागला.

तरुण दिसायचं असेल तर आरोग्य जपण्याइतकंच चेहऱ्यावरील फॅट्सही जास्त महत्त्वाचे आहेत हे समजलं, आणि तेच त्याच्याजवळ नव्हतं. मग त्याने ‘बेबी फेस प्रोजेक्ट’ राबवून चेहऱ्यावरची गेलेली चरबी कशी मिळवायची, यावर लक्ष केंद्रित केलं. त्या प्रोजेक्टनुसार त्याच्या चेहऱ्यावरची चरबी वाढवण्यासाठी उपचार करण्याची गरज होती. त्यासाठी एक विशिष्ट इंजेक्शन चेहऱ्याला टोचणे हा पर्याय होता. या इंजेक्शनमुळे चरबी निर्माण करण्यास शरीराला प्रोत्साहन मिळतं. स्वत:च्या शरीरातील चरबी काढून चेहऱ्यावर इंजेक्शनद्वारे टोचणे हा पर्याय होता. पण आहारातील उष्मांक अगदीच कमी केल्याने ब्रायनच्या शरीरात फारशी चरबी नव्हती. शेवटी ‘बेबी फेस प्रोजेक्ट’ची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी ब्रायनच्या चेहऱ्यावर दुसऱ्याची चरबी टोचली गेली. पण त्यानंतर जे घडलं ते ब्रायनसाठी फारच वेदनादायी ठरलं. 

खरंतर एवढा मोठा झटका बसल्यानंतर ब्रायन शांत बसेल, असं इतरांना वाटलं. पण ब्रायन मात्र हा अंदाज चुकवून ॲन्टीएजिंगच्या प्रकल्पातला पुढचा प्रयोग करण्यासाठी तयार झाला. ब्रायनच्या मते तारुण्य टिकवण्यासाठीचं एखादं उत्पादन बनवणं आणि स्वत: उत्पादन बनणं या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपण जेव्हा स्वत:वर प्रयोग करतो तेव्हा एवढा धोका स्वीकारावाच लागतो, असाच ब्रायनच्या सांगण्याचा सूर होता.

अर्थात ब्रायनने आपला सुजलेला चेहरा, त्यामागचं कारण, आपले प्रयोग, त्याचे परिणाम असं सर्व समाज माध्यमावर टाकल्याने उलटसुलट प्रतिक्रिया मिळणं स्वाभाविकच होतं. अनेकांना ब्रायनचा हा निसर्गाविरुद्ध जाण्याचा प्रयत्न अजिबात मान्य नाही. तर अनेकांना आरोग्याबाबत सजग असणं आणि दीर्घायुषी होण्यासाठी, वार्धक्य पुढे ढकलण्यासाठी, चिरतरुण दिसण्यासाठी प्रयोग करणं या दोन्ही गोष्टीत फरक आहे, असं वाटतं. 

आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करणं ही गोष्ट समजण्यासारखी आहे. पण चिरतरुण दिसण्यासाठीचे प्रयोग म्हणजे लोकांना अंधश्रद्धा वाटते. काहींचं म्हणणं आहे की, ब्रायन आपलं जैविक वय स्थिर करून दीर्घायुषी होण्यासाठी इतकी खटपट करतोय, समजा ती यशस्वी झाली... पण समजा अपघात झाला, तर? मग हे सर्व करण्याचा काय उपयोग? लोकांच्या या टीकेवरही ब्रायनकडे उत्तर आहेच. तो म्हणतो, ‘रोज गाडीत बसताना मी स्वत:ला हे नेहमी सांगतो, आजचा सर्वात मोठा धोका तू पत्करतो आहेस. हा धोका कायम असणार आहे. तसाच माझा मृत्यूला हरवण्याचा प्रयत्नही कायम राहणार आहे.’

हे कसलं जगणं?  

मृत्यू टाळण्यासाठी ब्रायन काटेकोर नियम पाळतो. दिवसभरात तीनवेळा खातो. ॲन्टिएजिंगसाठी जवळपास १०० गोळ्या घेतो. एलईडी लाइट घेऊन आंघोळ करतो. संध्याकाळी बाहेर पडत नाही. रात्री लवकर आणि एकटाच झोपतो. तो ना मद्य पीत, ना कोणाशी मैत्री करून गप्पा मारत. ब्रायनला आपल्या अशा जगण्याचं फार कौतुक आहे. इतरांना मात्र असं ब्रायनसारखं जगणं, वागणं अतिशय नीरस, निरर्थक वाटतं.

Web Title: Worldwide: Fat 'injection' to be 'eternal'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.