होय, आम्ही घुसखोरी केली - चीन
By admin | Published: August 1, 2014 09:48 AM2014-08-01T09:48:18+5:302014-08-01T10:21:55+5:30
भारतीय हद्दीत वारंवार घुसखोरी करणा-या चीनने गुरुवारी पहिल्यांदा जाहीरपणे भारतात घुसखोरी केल्याची कबूली दिली आहे.
Next
ऑनलाइन टीम
बीजिंग, दि. १ - भारतीय हद्दीत वारंवार घुसखोरी करणा-या चीनने गुरुवारी पहिल्यांदा जाहीरपणे भारतात घुसखोरी केल्याची कबूली दिली आहे. २०१३ मध्ये चीनचे जवान भारतीय हद्दीत पोहोचले होते. मात्र नियंत्रण रेषेवरुन उडालेल्या गोंधळामुळे ही घटना घडली होती असे चीनच्या लष्करी अधिका-यांनी म्हटले आहे.
चीनच्या लष्कराने गुरुवारी प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांसाठी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत चीनच्या संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल गेंग यानशेंग यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यात यानशेंग यांनी गेल्या वर्षी भारत - चीन नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण करणा-या काही घटना घडल्या होत्या. पण आम्ही त्यावर चर्चा करुन तोडगा काढला असे मान्य केले. सीमा रेषेविषयी गोंधळ असून दोन्ही देशांची सीमा रेषेविषयी स्वतंत्र धारणा आहे असे येनशांग यांनी स्पष्ट केले.
गेल्यावर्षी चीन सैन्याने लडाखमधील देपसांगमध्ये घुसखोरी केली होती. देपसांगमध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांनी थेट तंबूच ठोकले होते. चीनच्या पंतप्रधान ली केकियांग यांच्या दौ-यापूर्वीच ही घटना घडली होती. यानंतर दोन्ही देशांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला. अखेरीस महिना भराच्या चर्चेनंतर चीनने देपसांगमधून माघार घेतली होती. गुरुवारी यानशेंग यांनी याच घटनेचा दाखला दिला असला तरी देपसांगचे थेट नाव घेणे टाळले.
भारत - चीनमधील सीमारेषेचा वाद जूना असून दोन्ही देश आता या वादावर तोडगा काढण्याची तयारी करत आहे. बॉर्डर डिफेन्स कोऑपरेशन अॅग्रीमेंट या कराराचा दाखला देत यानशांग म्हणाले, दोन्ही देश या करारानुसार सीमारेषेवरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न करत आहेत.