जालना जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार बालकांना पल्स पोलिओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:06 AM2019-03-11T00:06:31+5:302019-03-11T00:06:50+5:30
जिल्ह्यातील १ हजार ७१७ बुथवर २ लाख ५४ हजार २९० बालकांपैकी २ लाख ३३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील १ हजार ७१७ बुथवर २ लाख ५४ हजार २९० बालकांपैकी २ लाख ३३ हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.
जिल्हा महिला व बाल रुग्णालयात सकाळी १० वाजता पल्स पोलिओ मोहिमेच्या शुभारंभ करण्यात आला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खतगावकर , वैद्यकीय अधीक्षक तसेच दवाखान्यातील डॉक्टर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा व शल्य चिकित्सक डॉ. राठोड यांनी मोहीमेची माहिती दिली. त्यानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आगामी पाच दिवस घरोघरी एक पथक पाठवून ज्या बालकांना रविवारी मात्रा देणे पालकांना शक्य झाले नाही, अशा बालकांना पोलिओ मात्रा पाजण्यात येणार आहे. रविवारी ठराविक पल्स पोलिओ केंद्रांबरोबरच जिल्ह्यात बसस्थानक व रेल्वेस्थानक येथे देखील पल्स पोलिओ मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २१३ उपकेंद्राअतंर्गत ग्रामीण भागातील ० ते ५ वर्षांच्या आतील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात आला. बथुवर ४ हजार ६६९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.