जालना : जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्टाँगरूम तयार करण्यात आल्या आहेत. या स्टाँगरूमच्या सुरक्षेसाठी २०० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात शुक्रवारी ४४६ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. नागरिकांनी मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. जिल्ह्यात तब्बल ८२.३२ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर सर्व मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना एसटी बसने सोडण्यात आले. १८ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याने ईव्हीएम मशीन ठेवण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्टॉगरूम तयार करण्यात आल्या आहेत. या काळात काही गरबड होऊ नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्टाँगरूमच्या सुरक्षेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातर्फे प्रत्येक ठिकाणी २५ पोलीस अधिकारी व कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यातर्फे कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. भोकरदन येथील स्टाँगरूम येथे उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलशिग बहुरे, पोलीस निरीक्षक चतुर्भुज काकडे यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. या ठिकाणी तीन अधिकारी, २० पोलीस कर्मचारी व १० होमगार्ड तैनात करण्यात आले.