जालना : आगामी २०२१-२२ वर्षाचा विकास आराखडा शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. या बैठकीत २५७ कोटी ३४ लाख ९१ हजार रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली. जिल्ह्याच्या विकास आराखड्याच्या निधीत आणखी भरीव वाढ करून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल, त्यात मोठ्या रकमेचे नियोजन करून घेऊ, असेही टोपे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उत्तम वानखेडे, आ. बबनराव लोणीकर, आ. कैलास गोरंट्याल, आ. नारायण कुचे, आ. संतोष दानवे, आ. राजेश राठोड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.
.....
काेणत्या विभागाला किती निधी...
प्रारूप आराखड्यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत १८१ कोटी १३ लाख रुपये.
जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) अंतर्गत ७३ कोटी ९६ लाख आणि जिल्हा वार्षिक योजना (ओटीएसपी) अंतर्गत २ कोटी २५ लाख ९१ हजार रुपये अशा वित्तीय तरतुदीचा आराखडा मंजूर करण्यात आला.
यामध्ये कृषी व संलग्न सेवासाठी १६ कोटी ९५ लाख ३६ हजार, ग्रामीण विकासासाठी १० कोटी, विद्युत, ऊर्जा विकाससाठी ९ कोटी ६१ लक्ष ९० हजार, सामान्य आर्थिक विकासासाठी ५ कोटी २ लाख १६ हजार व सामाजिक व सामूहिक सेवा यासाठी ७२ कोटी ४२ लाख.
.....
निधी अखर्चित राहिल्यास कारवाई
कोविडच्या अनुषंगाने यावर्षी केवळ ३३ टक्केच निधी खर्च करण्यात आला. निधी खर्च करण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून यंत्रणांना वितरित करण्यात आलेला निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्यात येईल. प्राप्त निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यात यावा. ज्या विभागाचा निधी अखर्चित राहील, त्यांना जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.
.....
...तर संबंधित एजन्सीकडून रस्ते करून घ्या
नियोजन समितीच्या बैठकीत रस्त्यांसाठी १८ कोटी रुपये ठेवले आहेत. सध्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. समृद्धी महामार्ग, इतर मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू असल्याने वाळू, सिमेंट व इतर साहित्याची मोठी वाहने रस्त्यांवरून जातात. त्यामुळे रस्ते खराब होतात. ज्या एजन्सीच्या कामामुळे रस्ते खराब झाले, त्याच एजन्सीकडून रस्ते तयार करून घेण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
......
जालना पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे वीजबिल शून्यावर येणार
जालना नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे वीजबिल शून्यावर आणण्यासाठी सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. एक मेगावॅटचा प्रकल्प मेढाच्या माध्यमातून उभारण्यात येईल. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. या प्रकल्पाची वीज महावितरणला दिली जाईल, जेणेकरून जालना नगरपालिकेला पाणीपुरवठ्याचे बिल शून्य येईल, असेही टोपे म्हणाले.