४२ हजार जणांना झाली होती लागण; हिमतीने सामोरे जाण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग हादरले आहे. अर्थकारणासह मानवी जीवनालाही या विषाणूने धोक्यात आणले आहे; परंतु हा आजार झाला म्हणजे आपण यातून बरेच होणार नाही, असा गैरसमज न करता या आजाराला मानसिकदृष्ट्या खंबीर राहून औषधोपचार घेतल्यास यातून बरे हाेण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यातच अनेक ज्येष्ठ नागरिकांनी यावर मात करून पूर्ववत जीवन सुरू केले आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव गेल्या वर्षी ६ एप्रिलपासून झाला. पहिला रुग्ण याच दिवशी आढळून आला होता. त्यानंतर यावर उपाय करण्यासाठी डॉक्टर तसेच सरकार आणि प्रशासकीय पातळीवर अनेक प्रयत्न केले गेले. यातून मोठे यशही आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या आजाराने पुन्हा डाेके वर काढले आहे. कोरोनाची ही दुसरी लाट असल्याचा तज्ज्ञांचा दावा असून पहिल्या लाटेच्या तुलनेत ही लाट जास्त गतीने फैलणारी असल्याचे सांगण्यात येत त्यामुळे अनेकांना हा आजार जडत आहे. यातून बरे होण्यासाठी जे निकष घालून दिले आहेत. त्याचे पालन केल्यास सहीसलामत आजारावर मात करता येते.
जिल्ह्याचा पॉझिटिव्ही रेटही झाला कमी
जालना जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढला आहे. तो २४ एप्रिलपर्यंत १५.७ टक्के आहे.
घाबरू नका, आम्हीही हरवले आहे
आपण गेल्या ५० वर्षांपासून वेगवेगळे आजार पाहत आलो आहोत; परंतु सर्दी, खोकला आणि ताप एवढी गंभीर असू शकते हे कोरोनामुळे लक्षात आले आहे. या आजारावर मात करण्यासाठी तुमची मनाची खंबीरता महत्त्वाची ठरते. त्यामुळे आजार झाल्यावर घाबरून जाऊ नये.
- गणेश रोकडे
गेल्या काही महिन्यांमध्ये आमच्या घरातील अनेकांना तापेची लक्षणे दिसू लागली; परंतु ताप म्हणजे संसर्ग नव्हे, अशी धारण होती. मात्र, कोरोनाने ही धारणा पूर्णपणे बदलली आहे. या आजाराने मलाही घेरले होते; परंतु योग्य त्या औषधाने आपण बरे झालो.
- शेंफडाबाई तळेकर
प्रवास करत असताना आपल्याला कोरोनाची लागण झाली असावी, ती झाल्यानंतर आपण घेतलेले उपचार महत्त्वाचे ठरले. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सर्व काही केल्याने आपण या आजारावर मात केली आहे.
- रंजनी जोशी
कोरोना हा आजार जेवढा गंभीर आहे. तेवढेच तो आजार होऊन गेल्यानंतर होणारे परिणाम अनेक रुग्णांमध्ये वेगवेगळे आहेत. कोरोना झाला म्हणजे आपले सर्वस्व हरवले. प्रथम ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्या कमी जणांना मानसिक आजार जडत असल्याचे गेल्या वर्षभरातील पाहणीतून दिसून आले. महिना ते दीड महिना अशक्तपणामुळे चिडचिड होते; परंतु नंतर हेही थांबते. असे अभ्यासातून दिसून येत असल्याचे समोर आले आहे.
- सूरज सेठीया,
मानसोपचार तज्ज्ञ