लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आचारसंहितेच्या शिथिलते नंतर जिल्हा प्रशासनाने चारा छावण्यांना मंजुरी दिली आहे. जिल्ह्यात आज घडीला २७ चारा छावण्या सुरू असून, त्यात सहा हजारपेक्षा अधिक जनावरांची संख्या असल्याची माहिती सोमवारी झालेल्या कार्यशाळेत देण्यात आली. शौर्य अंतर्गत चारा छावणी सुरू झाल्यावर नेमकी कोणती काळजी घ्यायची त्याचे प्रशिक्षण सोमवारी देण्यात आले.या प्रशिक्षण कार्यक्रमास शासनाने नियुक्त केलेल्या एक तज्ज्ञ संस्थेकडून या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यात प्रत्येक जनावरांच्या कानाला एक टॅग लावणे बंधनकारक करण्यात आले असून, त्यांना चांगल्या दर्जाचा चारा देण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्ये चारा छावणीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे निर्देश यापूर्वीच देण्यात आले आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात व्हिडीओ कॉन्फरंस घेतली. यावेळी जिल्हाधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कॅबिनमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन न करता, थेट खेड्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले होते.त्यामुळेच रविवार असतानाही जिल्हाधिकारी आणि उपायुक्त हे अंबड दौ-यावर गेले होते. त्यावेळी त्यांनी जालना अंबड पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. ही पाहणी करत असताना व्हॉल्वमधून अनेक नागरिक थेट पाणी भरताना दिसून आले. व्हॉल्वची गळती रोखण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला दिले.
२७ चारा छावण्यांमध्ये सहा हजार जनावरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 1:03 AM