वीज ग्राहकांचे ८२ लाख रूपये पुन्हा ग्राहकांच्या खात्यात वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 01:18 AM2018-12-27T01:18:39+5:302018-12-27T01:19:03+5:30
वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात वीज ग्राहकांकडून घेतलेला धनादेश आल्या नंतर संबंधित वीज ग्राहकाच्या वीजबिलातून ती रक्कम कमी करून तो धनादेश वीज वितरणच्या खात्यात जमा करण्या ऐवजी तो न वटल्याचे दाखविण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात चौकशी होऊन त्याचा अहवाल जालना कार्यालयास प्राप्त झाला आहे.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात वीज ग्राहकांकडून घेतलेला धनादेश आल्या नंतर संबंधित वीज ग्राहकाच्या वीजबिलातून ती रक्कम कमी करून तो धनादेश वीज वितरणच्या खात्यात जमा करण्या ऐवजी तो न वटल्याचे दाखविण्यात आल्याचा घोटाळा उघडकीस आला होता. या प्रकरणात चौकशी होऊन त्याचा अहवाल जालना कार्यालयास प्राप्त झाला आहे.
त्यात यापूर्वीच उच्च स्तर लिपिक पंकज सरदेशपांडे आणि सहायक लेखापाल अडकिने यांना निलंबित केले होते. तर या प्रकरणात ज्या चार अधिकाऱ्यांकडे जालना विभागाचा पदभार होता, त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जालना येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात एक डिसेंबर २०१७ ते १५ नोव्हेंबर २०१८ या काळात जवळपास १५० पेक्षा अधिक ग्राहकांच्या पावत्या फाडून धनादेश जमा करण्यात आल्याचे दर्शविले होते. मात्र ते वीज वितरण कंपनीच्या खात्यात जमा झाले नव्हते. हा नेमका घोटाळा की निष्काळजीपणा नेमका कसा झाला याची चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारीही चक्रावून गेले. केलेल्या चौकशीत त्यांनी पंकज सरदेशपांडे आणि सहायक लेखापाल मायानंद अडकिने तसेच अधीक्षक अभियंता कार्यालयातील लेखाधिकारी अतुल वडसकर यांच्यावर ठपका ठेवला आहे.
एकूणच या प्रकरणी जालना शहर विभागाचे मुख्य अभियंता आर. एल. मोरे यांनी सांगितले की, नुकताच या प्रकरणाचा चौकशी अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार वीज वितरण कंपनीचे जवळपास ८२ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार ज्यांनी वीजबिल भरण्यासाठी धनादेश दिले होते. ती रक्कम काढून ती पुन्हा वीज वितरणच्या खात्यात वर्ग करून संबंधित ग्राहकांना दिलासा दिला आहे.
एकूणच या प्रकरणात मी रूजू होण्यापूर्वी ज्या चार अधिकाºयाकडे पदभार होता, त्यांचीही चौकशी होणार आहे. एवढे सर्व होत असताना त्यांनी या बाबींकडे दुर्लक्ष कसे केले, या बद्दल त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
दरम्यान, जालन्यातील ५०२ वीज ग्राहकांनी २८२ धनादेश दिले होते. त्याची रक्कम ८२ लाख रूपये होते असेही मोरे यांनी सांगितले. या प्रकरणी आम्ही २० डिसेंबरलाच कदीम पोलीस ठाण्यात सरदेशपांडे आणि अडकिने यांच्या विरूध्द गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज दिला असल्याचेही मोरे यांनी सांगितले. ही रक्कम दंड आणि व्याजासह वर्ग केल्याचेही सांगितले.