जालना : विनापरवाना अग्निशस्त्र बाळगणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. ही कारवाई सोमवारी सकाळी शहरातील हरिगोविंदसिंग नगर भागात करण्यात आली. या प्रकरणात तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागरसिंग फंट्यासिंग अंधरेले (३०, रा. हरिगोविंदसिंग नगर, सरस्वती माता मंदिराजवळ, खरपुडी रोड, जालना) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. शहरातील खरपुडी रोड भागात राहणाऱ्या एकाच्या घरी विनापरवाना अग्निशस्त्र असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीवरून पथकाने सोमवारी सकाळी सागरसिंग अंधरेले याच्या घरी कारवाई केली. त्यावेळी ११ हजार २४५ रुपये किमतीचे लाकडी बटमध्ये फिक्स केलेले अग्निशस्त्र (भरमार) त्यासाठी वापरणारी बारुद पावडर, एक लोखंडी छडी, एक छऱ्याचे पाकीट पोलिसांनी जप्त केले. तसेच सागरसिंग अंधरेले याला मुद्देमालासह तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. रामेश्वर खनाळ, सपोनि. आशिष खांडेकर, पोउपनि. प्रमोद बोंडले, पोउपनि. राजेंद्र वाघ, अंमलदार सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, लक्ष्मीकांत आडेप, सागर बाविस्कर, सतीश श्रीवास, योगेश सहाने आदींच्या पथकाने केली.