जालना : कोरोना लसीकरणात फ्रंटलाइनवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली गेली. आता पोलीस, महसूल व नगरपालिका कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत ४ लाख ५० हजार जणांनी लस घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. कोरोना लसीकरणाचे काम राज्यभर सुरू आहे. फ्रंटलाइनवर कर्तव्य बजावीत असलेल्यांसाठी लसीकरण टप्प्या-टप्प्याने सुरू आहे. पहिल्या टप्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश होता. आता महसूल, पोलीस प्रशासनासह नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जात आहे. राज्यात आजवर साडेचार लाख जणांना लस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनीही लस टोचून घेण्याचे सांगण्यात आले आहे. राज्यात दररोज ५० हजार जणांना लस देण्याचे काम सुरू असल्याचेही टोपे म्हणाले.
चौकट.....
त्याच क्षणी मीही लस टोचून घेईन
लसीकरणात कोणा-कोणाला समाविष्ट करून घ्यायचे, याचे निर्देश केंद्र सरकारकडून प्राप्त होत असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापपर्यंत राजकीय नेत्यांना लस देण्याचे आदेश दिलेले नाहीत. त्यांची सूचना ज्या दिवशी येईल, त्याच क्षणी मी लस टोचून घेईल, असेही टोपे म्हणाले.
चौकट....
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रस्ताव मंत्रिमंडळ स्तरावर
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहेत. बुलडाणा, परभणी व जालना येथील प्रस्तावांवर आरोग्यमंत्री या नात्याने मी स्वाक्षरी केलेली आहे. आता हे प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येतील. उस्मानाबाद, रायगड, सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहेच, तेथील प्रवेश प्रक्रिया या वर्षात सुरू होण्याची शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली.