माझ्यावरील आरोप राजकीय हेतूने -कैलास गोरंट्याल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 12:40 AM2019-07-24T00:40:47+5:302019-07-24T00:41:23+5:30
माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत आहेत. यात काहीच तथ्य नाही. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माझ्यावर वैयक्तिक स्वरुपाचे गैरव्यवहाराचे आरोप राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे त्यांच्या भाच्याला समोर करुन करत आहेत. यात काहीच तथ्य नाही. सर्व आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.
पालिकेच्या स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, शहरातील रस्ते, दिवाबत्ती, मालमत्ता विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, घनकचरा प्रकल्प, वाहन खरेदीत अनियमितता, कर वसुली यासह अन्य विभागात गैरव्यवहार झाल्याची तक्रार अर्जुन खोतकर यांचे भाचे नीलेश हरिष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २६ जून रोजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री कक्ष कार्यालयाने विभागीय आयुक्तांना याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले.
या सर्व बाबीचा माजी आ.गोरंट्याल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत इन्कार केला. २०१५ - १६ मध्ये पालिकेत आमची सत्ता नसतानाही ही तक्रार केल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. आम्ही चौकशीस सामोरे जाणार असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, विजय चौधरी, राम सावंत, शेख महेमूद, गणेश राऊत, सभापती श्रावण भुरेवाल, जीवन सले यांची प्रमुख उपस्थिती होती.
आम्ही डोळ्यावर पट्टी बांधली नाही
जालना पालिका म्हणजे गोरंट्याल यांची खाजगी मालमत्ता असल्या सारखा व्यवहार करत आहेत. तेथील वेगवेगळ्या विभागांतील बिलांची माहिती काढल्यावर मोठे धक्कादायक प्रकार पुढे आले आहेत. यावर आम्ही गप्प बसणे म्हणजे जालन्यातील जनेतेचा विश्वासघात केल्यासारखे होणार आहे. त्यामुळेच आम्ही चौकशीची मागणी केली आहे. त्या चौकशीतून जे वास्तव पुढे येईल, ते आम्हालाही मान्य राहील. त्यामुळे राजकीय हेतूने प्रेरित होऊन हे आरोप आपण करत आहोत, असे म्हणणे चुकीचे ठरेल. -अर्जुन खोतकर, राज्यमंत्री